लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरूनमारून आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणखी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लंडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच.डी मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी.
एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढय़ांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढय़ा वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षांत चीमनधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत. पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढय़ांची कहाणी सांगतं. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे.
चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स-अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढय़ांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलुम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहातो.
चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हातपाय जाऊन ती अपंग झाल्याची करुणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे.
दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोडय़ाफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाटय़ाला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं. पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांतं दर्शन या पुस्तकातून घडतं.

* मुक्त विहंग,  चीनच्या तीन कन्या
मूळ लेखन : युंग चँग
अनुवाद : डॉ. विजया बापट
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : ६१२
  मूल्य : ६००/-