News Flash

यशस्वी झुंज कॅन्सरशी

सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यावर तिच्या एका स्तनाला कॅन्सरची बाधा झाली.

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला एकटीने तोंड देत धैर्यानं मृत्यूशी मुकाबला करत त्याच्याकडे पाठ फिरवून पुन्हा आनंदाने जगणं सुरू करणाऱ्या सुसान डंकनची ‘साल्व्हेशन क्रीक’ एक अपेक्षित जीवन ही वसू भगत यांनी अनुवाद केलेली कथा आहे.
माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण सोडून सुसान प्रथम एका फॅशन मॅगेझिनमध्ये पत्रकार म्हणून उमेदवारी करते. कालांतराने मेलबर्नच्या ‘द सन’ या वृत्तपत्रात नोकरी करते. रेडिओ, वृत्तपत्रात, नियतकालिकं यासाठी २५ र्वष काम केल्यावर केवळ स्त्रियांसाठी असलेल्या आणि प्रचंड खपाच्या दोन नियतकालिकांची ती संपादक असते.
तिच्या आयुष्यातील दोन अतिशय जवळच्या व्यक्ती, तिचा भाऊ आणि पती या दोघांचा केवळ तीन दिवसांच्या अंतराने मृत्यू होतो. ते दोघंही कॅन्सरचे रुग्ण असतात. त्यांचा मृत्यू हा तिच्यासाठी जबरदस्त मानसिक धक्का असतो. एखाद्या प्रश्नातून सुटायचं असेल तर त्याला दूर सारून पुढे चला या मेलबर्न पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या शिकवणीनुसार ती वागू लागते. मनातील दु:ख बाजूला सारून चेहऱ्यावर उत्साहाचा मुखवटा चढवत, मनाभोवती भक्कम तटबंदी उभारत पुन्हा ऑफिसच्या कामात स्वत:ला झोकून देते.
अशातच एक दिवस सकाळी तिला अंथरुणातून उठताच येत नाही. सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यावर तिच्या एका स्तनाला कॅन्सरची बाधा झाली असल्याचे निदान होते. वयाच्या पंचेचाळिशीला आलेली सुसान खरतर ही बातमी कळल्यावर पूर्ण कोलमडून जाते. केमोथेरपीचे इतर रुग्ण पाहिल्यावर आपलीही अवस्था आता अशीच होणार या विचाराने ग्रासून जाते, पण तरीही केमोथेरपीसाठी तयार होऊन त्याचे दुष्परिणाम सजग मनाने सहन करते. केमो उपचार घेऊन झाले की पुन्हा अगदी नेहमीचे, नॉर्मल आयुष्य जगत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण शेवटी केमोच्या दुष्परिणामांमुळे जेव्हा शरीर आणि मेंदू तिला पत्रकारितेच्या कामात साथ देईनासे होतात तेव्हा ती ते काम नाइलाजाने थांबवते.
तिला कॅन्सर झाल्याचं कळल्यावर तिचा प्रियकर तिला सोडून जातो. भावाच्या व पतीच्या मृत्यूच्या वेळी तिला एक गोष्ट पक्की कळलेली असते की जर तुमचा मृत्यू अटळ असेल तर तुमच्या आयुष्यातील आशा, आकांक्षा, यश, भौतिक सुख या सर्वाचा येणाऱ्या मृत्यूवर काहीही परिणाम होत नाही. तिला आता कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि ताणतणाव नको असतो. हवे असते ते फक्त मन:स्वास्थ्य अन् शांती.
या शांतीच्या शोधार्थ ती शहरी जीवनापासून दूर जाऊन राहण्याचा निर्णय घेते. पिटवॉटर येथील समुद्रकिनारी वसलेल्या लव्हेट बे या निसर्गरम्य परिसरात घर घेऊन ती राहायला येते. आपले एकटेपण दूर करण्यासाठी ती दोन कुत्र्याची पिल्लं पाळते. तिच्याही नकळत ती दोघं तिच्या रोजच्या जगण्याचं कारण होऊन जातात. पिटवॉटरच्या समुद्रकिनारी राहात असताना तिथल्या निसर्गाचे क्षणोक्षणी बदलणारे मोहक रूप अनुभवण्यात सुसान रमून जाते. रुपेरी पहाट, ज्वालेच्या रंगाचा सूर्योदय, भगभगती दुपार, झाडांचा हिरवा रंग गडद करणारी सांजवेळ हे सगळं विरघळवून घेणारी काळोखी रात्र. तेथील लव्हेट बे हे स्वत:च स्वत:चा कॅलिडोस्कोप असल्यासारखं बदलत्या रंगांच ठिकाण असतं. रंगांप्रमाणेच त्या त्या वेळचे हवेत भरून राहिलेले विविध गंध, ओहोटीच्या वेळेचा ओल्या कोरडय़ा रेतीचा दमट व खारट वास. दिवसाच्या चाळीस डीग्री तापमानातील निलगिरीचा भाजका वास. बाभळीच्या फुलांचा गोडसर गंध. पावसाळ्यातील भुरूभुरू, पावसात उजेड अन् सावल्यांचा खेळ, समुद्राच्या लाटांवर उमटणारं फेसांचं नक्षीकाम अशा वेळी वातावरणातील बदलानुसार आजूबाजूच्या निसर्गातील आवाज टिपणे, जसे की समुद्राची गाज, खळखळत्या लाटा, कॅबेन पामची रेशमी सळसळ, त्यांच्या पानांचा पियानोच्या सुरावटीसारखा वाटणारा कंपयुक्त आवाज, असा विलोभनीय निसर्ग तिच्यातील जगण्याची आशा वाढवू लागतो.
अशा वेळीच तिची बॉब अन् बार्बरा या जोडप्याशी मैत्री होते. दुर्दैवाने बार्बराही कॅन्सरग्रस्त असते. तिच्या आयुष्यात जास्तीतजास्त आनंदाचे क्षण देण्याचा सुसान मनापासून प्रयत्न करते. जेव्हा जेव्हा तिच्या मनात निराशा दाटून येते तेव्हा कठोरपणे विचार करत, आपल्याला अजून कणखर आणि खंबीर व्हायला पाहिजे असं बजावून सांगत, हेच विचार शेवटीही तिला आनंदाच्या वाटेकडे घेऊन जातात. आयुष्यात कधीही हताश न होता, हातपाय गाळून न बसता, घडणाऱ्या बदलांचा संकटापासून पळण्यासाठी वापर करण्याऐवजी स्वीकार करायचा हे सुसानला जाणवते.
वादळात भरकटलेल्या जहाजाला जसा किनारा मिळतो त्याचप्रमाणे सुसानचे दु:खद आयुष्य संपून तिला सुखी प्रवासाचा मार्ग व जोडीदार मिळतो. माणूस जेव्हा दु:ख व्याधी आणि जीवनाची अशाश्वतता यांच्याशी झगडत असतो तेव्हाच्या मानवी मनाच्या अवस्थेचं अगदी बारकाईनं केलेलं वर्णन हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. संकटातदेखील आयुष्य जगण्याची उमेद आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करायला प्रोत्साहन देणारं पुस्तक असं म्हणावं लागेल. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी आहे.
साल्व्हेशन क्रीक   एक अनपेक्षित जीवन
    मूळ लेखन : सुसान डंकन
अनुवाद : वसू भगत
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
    पृष्ठे : ४१०
मूल्य : ३९५/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:30 am

Web Title: reviews of book salvation creek by susan duncan
Next Stories
1 आरसा चीनचा
2 शिक्षणाची आच
3 माहितीचा खजिना
Just Now!
X