03 August 2020

News Flash

एका अवलियाचा जीवनप्रवास

एक सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून ते ख्यातनाम झाले आणि अचानक त्यांच्या जीवननाटय़ाचा पडदा कायमचा पडला.

मधुसूदन कालेलकर हे मराठी नाटककारांमधलं एक महत्त्वाचं नाव. ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘अपराध मीच केला’, ‘दिल्या घरी सुखी रहा’ अशी त्यांनी लिहिलेली नाटकं गाजली. नाटकांबरोबरच त्यांनी हिंदी-मराठी चित्रपट कथा-पटकथा-संवाद व उत्तमोत्तम मराठी गीतं लिहिली. ‘तो राजहंस एक’ हे कालेलकरांवरचं रमेश उदारे यांनी संपादित केलेले पुस्तक कालेलकरांचा प्रवास उलगडणारं  आहे. कालेलकरांसंबंधी घेतलेल्या विविध मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.  पुस्तकाचा काही भाग कंटाळवाणा ठरणारा असला तरीही या पुस्तकाद्वारे त्यांचा जीवनप्रवास टिपण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.

दिवसरात्र एक करून कालेलकरांनी ‘अपराध मीच केला’ हे नाटक लिहिले. या नाटकात त्यांनी त्यांचे हेडमास्तर नाबरांची व्यक्तिरेखाही टाकली. कारण कालेलकर मॅट्रिकची प्राथमिक परीक्षा पास झाल्यानंतरही त्यांची सहा महिन्यांची फी व अर्जाचे पैसे शिल्लक असल्याने त्यांना परीक्षेचा अर्ज देण्यात आला नव्हता. घरची परिस्थिती बेताची असल्याने ‘‘सर, एवढे पैसे मी भरू शकत नाही. मी काही तरी कामधंदा करून पैसे मिळवीन आणि पुढल्या वर्षी परीक्षेला बसेन,’’ असे कालेलकर म्हणाले. हे ऐकताच नाबर मास्तर खेकसले आणि म्हणाले, ‘‘मूर्खा, एक वर्ष फुकट घालविणार? आयुष्यातल्या फुकट गेलेल्या एका वर्षांची किंमत माहीत आहे तुला? मी तुझी फी आणि अर्जाचे पैसे भरले आहेत.’’ इतकेच नव्हे तर मुंबईला परीक्षेला जाण्यासाठी म्हणून मास्तरांनी कालेलकरांच्या हातावर काही पैसे ठेवले व म्हणाले, ‘‘हे मी कर्ज दिलेलं नाही. फक्त या पैशांचं सार्थक कर.’’ एरवी कठोरपणे वागणाऱ्या नाबर मास्तरांच्या स्वभावातील या पैलूमुळे कालेलकर भारावून गेले आणि त्यांनी त्यांची ही व्यक्तिरेखा ‘अपराध मीच केला’ या नाटकात वापरली. मात्र, ही व्यक्तिरेखा पाहायला नाबर मास्तर हयात नव्हते.

अनंत बळवंत धुमाळ यांची माहिती देणारे या पुस्तकातील ‘झाला अनंत बळवंत’ हे प्रकरण कामाशी निष्ठा बाळगणाऱ्या कलाकारांचा जिद्दी स्वभाव टिपणारे आहे. इतर सर्वच लेखकांप्रमाणे कालेलकरांनाही महाभारताबाबत विलक्षण आकर्षण होते; पण त्याचप्रमाणे महाभारतावर हल्लीची पिढी विश्वास ठेवेलच असे नाही, हेदेखील त्यांचे स्पष्ट मत होते. कुंतीप्रमाणेच कुमारी मातेचा प्रश्न अजूनही चालू आहे; पण आजची स्री कुंतीसारखी समाजाला न घाबरता सरळ डॉक्टरकडे जाते आणि मोकळी होते, असेही कालेलकर गमतीने सांगतात. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेवर कालेलकरांनी आजच्या आधुनिक युगाचा आधार घेत टीका केली आहे. मात्र, त्याच वेळी कुंती आणि कर्ण यांच्यातील आई-मुलाच्या नात्याचाही कालेलकरांनी आदर केला आहे. मधुसूदन कालेलकरांना कर्णाने कित्येक वर्षांपासून झपाटून टाकले होते. १९५७ मध्ये फिल्मिस्तानमध्ये असताना कर्णावर सिनेमा करण्याचे कालेलकरांनी ठरविले होते. कर्ण, कुंती आणि अर्जुन हा त्रिकोण साकारण्याचा कालेलकरांचा प्रयत्न होता. कै. राजा नेने तो चित्रपट दिग्दर्शित करणार होते; पण तो चित्रपट सेटवर येऊ शकला नाही. कालेलकरांनी ‘विजयाचे वारस आम्ही’ हे नाटक लिहिले. त्यात अनौरस पुत्राची ठळक व्यक्तिरेखा कालेलकरांनी लिहिली आणि प्रेक्षकांच्या लक्षात तीच भूमिका राहिली. हे सांगताना कालेलकरांनी शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ कादंबरी येण्याआधी हे नाटक लिहिल्याचा खुलासाही केला आहे.

‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या रंगीत चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने कालेलकर यांना काश्मीरला जाण्याची संधी मिळाली. याचे रंजक वर्णन ‘आम्हीपण काश्मीरला जातो’ या प्रकरणात करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कालेलकरांच्या लग्नाचेही विनोदी वर्णन ‘मी लग्न करतो’ या प्रकरणात करण्यात आले आहे.

कालेलकरांच्या नाटकांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील कुटुंबवत्सलता, पांढरपेशा समाजातील सद्मूल्यांचा आविष्कार, चटपटीत संवाद, सर्वसामान्यांमधील ओळखीची वाटणारी पात्रे, ओळखीचे वाटणारे प्रसंग, प्रारंभ, मध्य आणि अखेर यामध्ये नाटकाची, कथानकाची बांधेसूद रचना आणि नर्म विनोद, शृंगार. ही सारी वैशिष्टय़े तत्कालीन मराठी वर्गाला आवडणारी होती. त्यांच्या नाटकांमधील कलाकारही कलानिपुण होते. कालेलकरांना संगीतामध्ये रुची होती. त्यामुळे त्यांची काही नाटके संगीतप्रधानही होती. नाटककाराएवढेच कालेलकर उत्तम कवीही होते. मराठी नाटकांतील यशानंतर कालेलकर सिनेसृष्टीकडे वळले. मात्र, तरीही त्यांचा काही काळ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेला. मात्र, स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या चित्रकथा पडद्यावर येऊ लागल्या. पाऊणशे मराठी तसंच हिंदी चित्रांच्या कथा, पटकथा नि संवाद त्यांनी लिहिले. एक सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून ते ख्यातनाम झाले आणि अचानक त्यांच्या जीवननाटय़ाचा पडदा कायमचा पडला.

* तो राजहंस एक

संपादन : रमेश उदारे

पृष्ठे : २२४

किंमत : २५० रुपये

उमेश जाधव response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2016 3:36 am

Web Title: to rajahans ek marathi book review
Next Stories
1 माहिती-विज्ञानाचा धागा गुंफी..
2 माणसांच्या ऱ्हासपर्वाचा आलेख
3 विज्ञानकथांची रोमांचक सफर
Just Now!
X