‘मी’ आणि ‘माझे’ हे काही आयुष्यात सर्वसामान्य व्यक्तीपासून सुटत नाही. मी हे केले, माझ्यामुळे ते झाले, मी असे करवले.. वगैरे आणि वगरे. काही प्रमाणात तसे ते असणे गर नसावे. परंतु ही मीपणाची असोशी कुठवर न्यावी याचे भान असणे गरजेचे असते. ते भान नसले तर हा मीपणाचा अजगर बघता बघता त्या व्यक्तीस गिळंकृत करून टाकतो. आणि कहर म्हणजे त्या व्यक्तीस हे असे झाल्याचे कळतदेखील नाही.
अशा व्यक्तींतील ‘मी’पणाचे रूपांतर मग ‘आम्ही’त होते. अशा व्यक्तींची मग धारणा होते.. मी तर थोर आहेच; पण माझे कुटुंबीयदेखील थोर. माझे पुत्र, सुना, नातू थोर. अशांची पुढची अवस्था त्याहीपेक्षा वाईट. अशा व्यक्ती मग ‘माझ्या जमातीचे सर्व थोर, माझ्या ज्ञातीतील सर्व थोर’ अशा अवस्थेपर्यंत पोहोचतात. अशांना हाताळणे ही मग मोठी सामाजिक डोकेदुखीच होऊन जाते. वास्तविक यात मी- मी वा आपले- आपले करावे असे काय असते? समर्थ म्हणतात-
कर्मयोगें सकळ मिळालीं।
येके स्थळीं जन्मास आलीं।
तें तुवां आपुलीं मानिलीं।
कैसीरे पढतमूर्खा।
याचा अर्थ असा, की यातील बऱ्याचशा
गोष्टी आपणास मिळण्यामध्ये आपला काही
वाटा नसतो. जसे की- जन्म. कोणत्या घरात
आपण जन्मणार, हे काही आपण अजून तरी ठरवू शकत नाही. तसेच आपला वर्ण, रूप, रंग, आपले भाऊबंद वगरे आपण तर काहीच ठरवून येत नाही. तरीही अशा सर्वाचा गर्व तो बाळगायचा काय म्हणून? रामदास तसा तो मानणाऱ्याचे वर्णन ‘पढतमूर्ख’ असे करतात. हे वाचल्यावर आपल्या आसपासच्या असंख्य मूर्खाची जाणीव वाचकांना झाल्यास नवल ते काय?
बरे, समस्या ही, की अशा मंडळींच्या आयुष्यात शहाणपणाचा उदय होण्यास बराच काळ जावा लागतो. काहींच्या बाबतीत तर तो काळ उगवतही नाही. या अशा व्यक्ती आपले मीपणाचे ओझे घेऊनच आयुष्यभर वावरतात आणि त्या ओझ्याखालीच निजधामास निघतात. तरीही त्यांचे मी- मी आणि माझे- माझे काही संपत नाही.
माथां प्रपंचाचें वोझें। घेऊन म्हणे माझें माझें।
बुडतांही न सोडी फुंजे। कुळाभिमानें।
वास्तविक आयुष्यात जन्माने मिळालेल्या गोष्टीचा ‘गर्व से कहो..’ असा अभिमान बाळगण्यात काहीही अर्थ नाही. जे आपण कमावलेलेच नाही, त्याचे यश का मिरवावे? रामदास म्हणतात-
कैचें तारुण्य कैचें वैभव। कैचें सोहळे हावभाव।
हें सकळही जाण माव। माईक माया।
म्हणजे या सगळ्याचे कौतुक बाळगण्याचे काहीच कारण नाही. तसेच कौतुक, अभिमान, दुरभिमान आणि गर्व या सर्वातील सीमारेषा फारच अंधूक आणि अस्पष्ट असतात. अभिमानाचे रूपांतर कधी दुरभिमानात होऊन मनुष्य ‘गर्व से कहो..’ अशा आरोळ्या देऊ लागतो, हे समजतदेखील नाही. या असमंजसतेच्या टप्प्यावर अचानक मृत्यू गाठतो आणि सगळे काही संपून जाते.
येच क्षणीं मरोन जासी। तरी रघुनाथीं अंतरलासी।
माझें माझें म्हणतोसी। म्हणौनियां।
तेव्हा माझे माझे म्हणत असे अंतर्धान का पावावे? रामदासांच्या सल्ल्याचा हा अर्थ आहे. तो समजून घेतला तर कळते..
सावध साक्षेपी साधक। आगमनिगमशोधक।
ज्ञानविज्ञान बोधक। निश्चयात्मक।
या गुणांचे महत्त्व. माणसाने स्वभावाने साक्षेपी असावे. विचक्षण असावे. ज्ञानविज्ञानाची कास निश्चयाने धरावी. याचा समर्थ किती सुगम सल्ला देतात-
सुगड संगीत गुणग्राही। अनापेक्षी लोकसंग्रही।
आर्जव सख्य सर्वहि। प्राणीमात्रांसी।
जी व्यक्ती मीपणात रमलेली असते, ती वाद घालते. कर्कश्शपणे वाद घालून इतरांना नामोहरम करण्यात आनंद मानते. याउलट, साक्षेपी हा संवादी असतो. आणि संवाददेखील कसा? तर- विवादरहित. रामदासांच्या भाषेत- वेवादरहित.
वेवादरहित संवादी। संगरहित निरोपाधी।
दुराशारहित अक्रोधी। निर्दोष निर्मत्सरी।
अशी व्यक्ती मत्सरी नसते. दुराचारी नसते. आणि क्रोधावर तर तिने मातच केलेली असते. तेव्हा हे असे होणे हे विचारी जनांचे ध्येय असावयास हवे. किमान असे आपणास जमायला हवे, असे तरी त्यास वाटावयास हवे. हे वाटणे गरजेचे आहे, कारण आपणास भेडसावणाऱ्या बहुतांश समस्या या मी आणि माझेपण या वृत्तीतून जन्माला आलेल्या आहेत. भाषा, वर्ग, वर्ण, सीमा आदी सध्याच्या विषयांचा या दृष्टिकोनातून विचार केल्यास समर्थाच्या विचारांचा अर्थ लागू शकेल.
हा झाला एक टप्पा. जे आपण मुळात कमावलेले नाही त्याचा अभिमान न बाळगणे, हा विचारी माणूसपणाचा पहिला टप्पा. संतपण त्यापुढे असते. हे संतपण म्हणजे- मी जे कमावलेले, बांधलेले, उभारलेले आहे त्याचादेखील अभिमान न बाळगणे. यासंदर्भात समर्थाच्या आयुष्यातील एक प्रसंग किती उदात्त आहे पाहा.
समर्थानी कोदंडधारी रामाचे आणि मारुतीची मंदिरे अनेक ठिकाणी उभारली. त्यांतील एक जनप्रिय मंदिर म्हणजे चाफळ येथील. प्रसंग असा की, या रामाच्या मंदिराची पूर्तता झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी साक्षात् छत्रपती शिवाजी महाराज यांनाच बोलावणे धाडण्याची इच्छा रामदासांच्या काही शिष्यांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे छत्रपतींना रीतसर निमंत्रण गेले. रामदासांनी बांधलेल्या मंदिराचेच उद्घाटन! छत्रपतींकडून ते अव्हेरले कसे काय जाईल? तेव्हा त्यांनी ते स्वीकारले आणि मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्तदेखील ठरला.
ती घडी समीप येऊन ठेपली तर काय..? समर्थच गायब. म्हणजे ज्याने हे भव्य मंदिर उभारले आणि ज्याच्या उद्घाटनासाठी दस्तुरखुद्द छत्रपतीच येणार असल्याचे जाहीर झाले, त्या मंदिराचा निर्माताच तेथून गायब झालेला. ही बाब सर्वासाठी चांगलीच धक्कादायक. तेव्हा रामदासांचा शोध सुरू झाला. गवसले ते. त्यावेळी त्यांच्या शिष्यांनी गळ घातली रामदासांना उद्घाटन सोहोळ्यास येण्याची. रामदासांनी ती अव्हेरली. म्हणाले, माझे काम होते मंदिर उभारण्याचे. ते झाले. तेव्हा आता मी काय म्हणून या मंदिरात गुंतावे?
प्रश्न बिनचूक. त्याच्या उत्तरात तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या जगण्यातील अनेक समस्यांवर उतारा सापडतो. म्हणजे असे की, आपण काही मंदिरे उभारावयास जात नाही. तेव्हा आपल्या आयुष्यातली उभारणी काय असते? तर- मुलांना शिकवणे, त्यांना मोठे करणे, आसपासच्या गरजवंतांना जमेल तितकी मदत करून त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास हातभार लावणे.. वगरे वगरे.
परंतु रामदास आणि आपण यांच्यातील फरक या टप्प्यावर सुरू होतो. आपण या छोटय़ा छोटय़ा गोष्टी उभारतो हे तर खरेच. आपल्यामुळे त्या मार्गी लागल्या, हेही खरे. परंतु आपण नकळतपणे त्यांच्यावर मालकी सांगू लागतो. तेथून समस्या सुरू होतात. तसेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष छत्रपती या छोटय़ा यशसोहळ्यात येण्याची काहीही शक्यता नसली तरी त्या सोहळ्याच्या साजरीकरणात आपण जीव गुंतवतो. जे काही उभारणे आहे ते उभारण्यास हातभार लावणे, हे आपले कर्तव्य. परंतु म्हणून त्याच्या उभारणीची पूर्तता झाल्यावर त्याच्या उद्घाटनासाठी रेंगाळणे अनावश्यक. रामदास चाफळच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी येण्याचा आग्रह करणाऱ्या शिष्यांना नकार देत म्हणाले-
दास डोंगरी रहातो। यात्रा देवाची पाहतो
हे असे डोंगरी राहता येणे हे आवर्जून अंगी बाणवावे असे कौशल्य नव्हे काय?

Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै