याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला. खरे तर ती तोंडओळखच म्हणावयास हवी. रामदासांनी आताच्या उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी उत्तर प्रांतांत केलेली भ्रमंती या उर्दू रचनांमागील प्रेरणा होती. या भ्रमंतीतून त्यांना उत्तर भारतीयांनाही जोडून घेण्याची गरज वाटली. त्यातून या रचना निर्माण झाल्या. लेखिका मनीषा बाठे यांनी विविध ठिकाणची जुनी दफ्तरे धुंडाळून या उर्दू रचनांचे संकलन केले आणि त्यांनी ते स्वत:च छापले.

या रचनांचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला आहे अमराठी युवकांसाठी समाजपरिवर्तनाची स्फूर्तिकाव्ये. यात प्रामुख्याने दखनी पदावल्या आढळतात. दुसरा भाग मुसलमानी अष्टके आणि स्फुटे. गणेश शारदा ते आलख निरंजन अशा अनेकांचा आधार घेत समर्थानी यात आपली मते व्यक्त केलेली आहेत. तिसरा प्रकार आहे तो मराठीबा हिंदू समाजासाठी ईशस्तवने. नावात सूचित केल्याप्रमाणे यात सरळ-साधी ईशस्तवने आहेत.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

यातल्या पहिल्या भागातल्या अनेक रचना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विविध रागांत बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सारंग, ललित, वगैरे. म्हणजे विचार गंभीर. आणि तशाच गंभीर सादरीकरणातून त्याची मांडणी. आपल्या भ्रमंतीत समर्थानी समाजाचे झपाटय़ाने होत असलेले अध:पतन जवळून पाहिले. अभ्यासले. ते रोखावयाचे तर कोणत्या प्रकारच्या वृत्तीची जोपासना या तरुणांत करवली पाहिजे, असा प्रश्न यांतून रामदासांना पडत गेला. कारण हे तरुण एका बाजूने परकीय आक्रमणाचा परिणाम सहन करत होते आणि त्याच वेळेस त्यांच्या भरकटण्यास या परकीय आक्रमणांनी अधिक गती येत होती. म्हणजे हे दुष्टचक्र परस्परपूरक होते. अशावेळी या तरुणांचा परिचय अद्वैताशी करून द्यायची निकड समर्थाना वाटली. त्यातूनच-

‘आलेख ज्यागे झुटी माया भागे

जन बीन है सो देव नीरंजन। संत संग शुधी लागे।।

मुद्रा आसन ध्यान समाधी।

देखन भेद न लागे।।

दास कहे साधु की संगत।

ताहां भवकाल न ज्यागे।।’

अशासारखी रचना रामदास लिहून गेले. ग्रंथप्रामाण्य वगैरे सोडा, परमेश्वरासाठी त्याची गरज नाही, प्रत्येक मानवात तो आहे, साधुसंतांच्या संगतीत त्याची जाणीव होईल, असे ते यातून सांगतात. थोडक्यात, धर्माकडे नव्याने कसे पाहायला हवे हे रामदास या तरुणांना त्यांच्याच भाषेत सांगतात. हा तरुण आसपास दिसणाऱ्या आक्रमकांना पाहून दडपलेला, गोंधळलेला आहे. रामदास त्याला म्हणतात-

‘ज्यागो रे तुम भाई। राजाराम की दुहाई।।

जगत का जोर देखकर। मत दहशत खाओ भाई।।

रामदास कहे दिल से बाबा। छोडो मोह बुराई।

प्रेम भय क्रोध तुमारे। अवर है दुष्मन कोई।।’

समर्थाच्या काळात- म्हणजे ते देशाटनास निघाले होते तोपर्यंत- देशात इस्लामी आक्रमकांची सत्ता साधारण ३०० वर्षांची जुनी होती. म्हणजेच एव्हाना ती स्थिरावलेली होती. त्यावेळच्या समाजाच्या अडचणी दुहेरी होत्या. एक म्हणजे पारंपरिक जातव्यवस्था आणि त्यामुळे पिचला गेलेला तळाचा समाज आणि वर दुसरीकडून हे यवनी आक्रमण. यातल्या एका टप्प्यावर हिंदू समाजात सातत्याने उपेक्षित राहिलेल्या एका वर्गास इस्लामचा स्वीकार करणे अधिक सोयीचे वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या समाजास रोखण्यासाठी आणि धर्मातरापासून वाचवण्यासाठीही समर्थानी काही रचना लिहिल्या.

‘येक ही जमीन येक हि पानी। येक आतश आसमान।

येक बाज आलम च्यलावत। येक ही चंद्रश्रुभान

रे भाई कायकु लडतें लडतें सब पडते।।’

ही अशीच एक. मुसलमानी काव्यांतून संवाद साधताना समर्थानी अद्वैत तत्त्वज्ञानाद्वारे ईश्वरी उपासनेबद्दल रचना केल्या आहेत. त्या करताना रामदासांनी धर्माच्या सामाजिक नियमांबद्दल वाच्यता केलेली नाही.

‘आलख वो निरंजन कैसा हय रे

किसेही सारिखा नहि क्या कहु रे’

अशा सोप्या सोप्या रचनांतून रामदास आपला संदेश पोचवत राहतात.

‘हमारे पिरोंने अकल सें बताया

निराकार अलाई सें मों मिलाया’

म्हणजे आपल्या पूर्वजांनी विचार करून सांगून ठेवले आहे, की ईश्वर हा निराकार आहे. अन्य कोणत्याही धर्माप्रमाणे इस्लामातही बाबा-बुवा होते आणि त्यांचेही अंगारेधुपारे चालत. त्यांच्याविषयी रामदास म्हणतात-

‘करामत्करे सो भुलाहे दिवाना

ईनो काक हंसो समज्जे तुमाना

करामत बुरि हे भुतों देवतोंकि

न कर्ना कबों बंदगी हि ईनोंकि।।’

म्हणजे करामत करणाऱ्यांना सगळेच भुलतात. असे भुलणारे मग कावळ्यांना संत मानू लागतात. तेव्हा असे होण्यापासून वाचायचे असेल तर भुताखेतांच्या, जादूटोण्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, असा रामदासांचा सल्ला आहे. दासबोधात त्यांचा अशाच अर्थाचा श्लोक आहे. तुमचा गुरू असला चमत्कार वगैरे करणारा असेल तर त्यास नाकारा.

‘ऐसे गुरू अडक्याचे तीन। मिळाले तरी त्यजावे’

अशी रामदासांची दासबोधातली मसलत आहे. त्याचा हिंदी आविष्कारही असाच लोभस आहे. दख्खनी हिंदीत लिहिताना ते म्हणतात-

‘आबे छोड दे बे करामत्भुतोंकि

बुरि छोड देना राह इन देवतोंकि

नहि बे नहि बे ईसे मे कछुहि

न मिले न मीले कबोंहि ईलाहि’

या भुताखेतांच्या, जादूटोण्यांच्या मागे जावयाचे असेल तर देव देव न केलेलेच बरे. कारण या मार्गाने ईलाही- म्हणजे देव मिळायची सुतराम शक्यता नाही. परमेश्वर या सगळ्यापेक्षा वेगळा असतो. या सगळ्यावर असतो. म्हणून मग रामदास म्हणतात-

‘खुदा कौन बंदा कहो ये हि कैसा

समजभी न फकिरी करे वो तमाशा

पिरोंकेहि मुंसे भला खोज्य लेना

कहे रामदासो न्यारा दिल न कार्णा..’

देव कोण? त्याचा खरा भक्त कोण? यावर कसले वाद घालता? हे वाद घालणे हेच मूर्खपणाचे आहे. बंद करा हे सर्व. कारण ईश्वर या सगळ्यापेक्षा निराळा आहे.

रामदासांच्या इस्लामी रचनांवर सुफी पगडा बराच आहे. त्यांनी एक रचना तर राजस्थानातील अजमेर येथील विख्यात गरीबनवाज दर्गा येथे केल्याचीदेखील नोंद आहे.

‘घट घट साहि यारे आज्यब आलमीया रे

ये हींदु मुसलमान दोन्हो चलावे’

अशी त्या रचनेची सुरुवात आहे. प्रत्येकाचा- मग तो हिंदू असो वा मुसलमान- रक्षणकर्ता तो ईश्वर.. म्हणजे आलामीया हाच आहे, असे रामदास सांगतात.

हे झाले इस्लामधर्मीयांसाठी. त्याच्याबरोबरीने रामदासांनी अमराठी समाजातील हिंदूंसाठीही पुष्कळ रचना लिहिल्या. त्याही फार मधुर आहेत.

‘हम तो बैरागी रामजी बाबा दरबार के।

गावत नाचत राम राम सीता राम के।’

या रचनांत कृष्ण वारंवार येतो. दक्षिणेकडच्या रचनांत रामदासांचा कोदंडधारी राम प्रमुख आहे. उत्तरेकडे कृष्ण. मोहन, कान्हा, ब्रजबाला, ब्रीजवाला अशी शब्दकळा रामदास आवर्जून वापरतात.

याचे कारण रामदासांचा त्यामागील विचार. आजच्या समाजकार्यकर्त्यांनी तो लक्षात घ्यायला हवा. ज्या समाजात आपल्याला सुधारणा करायच्या आहेत, बदल घडवायचा आहे, त्या समाजाची भाषा प्रथम अवगत करावी लागते. कारण या भाषेच्या माध्यमातून जनांच्या मनापर्यंत आणि मनातून मेंदूपर्यंत जाता येते. रामदासांचा अभ्यास का करायचा, यामागील हे एक कारण.                                                  (उत्तरार्ध)

समर्थ साधक   samarthsadhak@gmail.com