13 August 2020

News Flash

मूर्खासी समंध पडो नये

गेले काही महिने आपण रामदासांच्या विविध वाङ्मयाचा परिचय करून घेतला.

गेले काही महिने आपण रामदासांच्या विविध वाङ्मयाचा परिचय करून घेतला. जसे की- विविध त्रयोदश भीमरूपी, अभंग वा लावण्या किंवा उर्दू वाङ्मय. यावरून आपल्याला एव्हाना त्यांच्या साहित्याच्या परिघाचा अंदाज आला असेल. आता पुन्हा एकदा आपण दासबोधाकडे वळू.

याचे कारण ‘दासबोध’ समर्थ रामदासांच्या सर्व वाङ्मयावर दशांगुळे उरतो. आपली संपूर्ण प्रतिभा, सर्जनशीलता रामदासांनी ‘दासबोध’निर्मितीवर लावली असावी असे तो वाचून वाटते. दुसरे असे की, या वर्षअखेरीस हे सदर संपेल. तेव्हा दासबोधातील व्यक्तिगत आवडीचे असे जे काही आहे त्याचा परिचय करून देणे आवश्यक वाटते. ‘दासबोध’ हा संपूर्ण ग्रंथच आनंददायी असला तरी त्यातील काही समास विशेष हे अतीव आनंददायी आहेत. ते वाचताना एक विशेष आनंद मिळतो. अतिशय साधी, सोपी आणि सुलभ मांडणी त्यांची आहे.

त्यातला असा एक समास म्हणजे दुसऱ्या दशकातला दुसरा. ‘उत्तमलक्षण’ असे त्याचे शीर्षक. फारच सुंदर रचना आहेत त्यातील. आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जगताना त्यातला प्रत्येक सल्ला उपयुक्त ठरू शकेल असा आहे. उदाहरणार्थ-

‘वाट पुसिल्याविण जाऊं नये। फळ वोळखिल्याविण खाऊं  नये ।

पडिली वस्तु घेऊं  नये। येकायेकीं।।’

किती सोपी गोष्ट आहे. रस्ता माहीत नसताना जाऊ नये. आणि उगीच समोर एखादं फळ झाडावरनं पडलंय, सुंदर दिसतंय म्हणून खायला जाऊ नये.

‘अति वाद करूं नये। पोटीं कपट धरूं नये।

शोधल्याविण करूं नये। कुळहीन कांता।।’

आता यातील ‘शोधल्याविण करू नये, कुळहीन कांता..’ हा शेवटचा श्लोक हल्लीच्या काळात प्रतिगामी वाटू शकेल. पण तो चारशे वर्षांपूर्वी लिहिलेला आहे, हे ध्यानात घेतल्यास तसा भासणार नाही. एका अर्थाने ही बाब कालातीत आहे. म्हणजे आजही कोणा मातेस आपल्या पुत्राचा वा कन्येचा विवाह होणार असेल तर ती/ तो कोणत्या घरचा आहे, कोठे राहते/ राहतो.. वगैरे चौकशी करावीशी वाटतेच. असो.

‘विचारेंविण  बोलों  नये। विवंचनेविण चालों नये।

मर्यादेविण हालों नये। कांहीं येक।।

प्रीतीविण रुसों नये। चोरास वोळखी पुसों नये।

रात्री पंथ क्रमूं नये। येकायेकीं।।’

हे चार श्लोकही तसेच. विचार केल्याशिवाय बोलू नये, हा सल्ला तर अलीकडच्या काळात प्रत्येकानेच ध्यानी ठेवलेला बरा. माध्यमांच्या या प्रस्फोटकाळात प्रत्येक जण इतका काही बोलतो आहे की कान किटून जावेत. या बोलण्यास ना विचार, ना उद्देश. तेव्हा रामदासांचा हा सल्ला तसा आजही महत्त्वाचाच. दुसऱ्या श्लोकातील पहिली ओळ ‘प्रीतीविण रुसो नये..’ हीदेखील अशीच चपखल.

कारण एखाद्यावर रुसायचे असेल तर मुळात अंत:करणात त्या व्यक्तीसंदर्भात प्रीती हवी. तीच जर नसेल, तर रुसण्याचा उद्देशच निर्थक. याच अनुषंगाने रामदासांचा आणखी एक सल्ला आहे-

‘क्षणाक्षणां रुसों नये। लटिका पुरुषार्थ बोलों नये।

केल्याविण सांगों नये। आपला पराक्रमु।’

आधी ते मुळात प्रेम असल्याशिवाय रुसू नये, असा सल्ला देतात. पण पुढे जाऊन हेही सांगतात, की सारखे आपले उठता-बसता रुसू नये. म्हणजे प्रेम आहे म्हणून आपले येता-जाता रुसणे-फुगणे वाढू लागले की त्याची किंमत जाते. तसेच अन्य सल्लेही. परिसराची काहीही माहिती नसताना रात्री येकायेकी हिंडावयास बाहेर पडू नये. केल्याखेरीज आपलाच पराक्रम उगाच सांगत बसू नये, हेदेखील महत्त्वाचे. अलीकडच्या काळात तर याचे महत्त्व फार. चार आण्याच्या कर्तृत्वाला बारा आण्यांचा मसाला लावून सांगण्याकडेच सगळ्यांचा कल. उत्पादनात खोट असली तरी हरकत नाही, पण त्याचे मार्केटिंग जोरात व्हावयास हवे. अशा काळात नव्या मंडळींना रामदासांचा सल्ला कालबाह्य़ वाटेल. पण तसा तो नाही.

खातरजमा करावयाची असेल तर संबंधितांनी ब्रँडिंग आदीचे सिद्धान्त तपासून पाहावेत. अति मार्केटिंग- मग ते स्वत:चे असो की एखाद्या उत्पादनाचे- हे अंतिमत: अनुत्पादकच ठरते असा इतिहास आहे. म्हणून एखादी व्यक्ती स्वत:ची टिमकी फारच वाजवावयास लागली की लवकरच या व्यक्तीची घसरगुंडी सुरू होणार आहे याची जरूर खात्री बाळगावी. या सल्ल्याला रामदासांनी उत्तमगुणलक्षणांत स्थान दिले आहे, हे महत्त्वाचे. स्वत:चे वा आपल्या उत्पादनाचे अतिरिक्त मार्केटिंग करू नये, हे रामदास सांगतात. पण म्हणून बोलावयाची वेळ आली तर गप्प राहू नये, असेही त्यांचे म्हणणे.

‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।

पैज  होड  घालूं  नये। काहीं  केल्या।’

सभेत काही वक्तव्य करावयाची वेळ आल्यास लाजू नये. बोलावे. परंतु त्यात बाष्कळपणा नसावा. तसेच पैज होड घालू नये.. हा त्यांचा सल्ला अन्य ठिकाणीही येतो. उगा एकमेकांशी स्पर्धा, पैजा लावण्यास त्यांचा सक्त विरोध आहे. यातून तात्पुरते शौर्य गाजवल्याचे समाधान मिळते; पण अंतिमत: या पैजा बाधकच असतात, असे रामदास म्हणतात.

‘आळसें सुख मानूं नये। चाहाडी  मनास  आणूं नये।

शोधिल्याविण करूं नये। कार्य कांहीं।

सुखा आंग देऊं  नये। प्रेत्न पुरुषें सांडूं नये।

कष्ट  करितां  त्रासों  नये।  निरंतर।’

किती सोपी शिकवण आहे. निरंतर कष्टाची तयारी ठेवावी अािण प्रयत्न करणे कधी थांबवू नये. हे असे व्यापक सल्ले देता देता समर्थ रामदास मधेच काही छोटे वैयक्तिक मुद्देही मांडतात. उदाहरणार्थ..

‘शोच्येंविण असों नये।  मळिण वस्त्र नेसों नये।

जाणारास पुसों नये। कोठें जातोस म्हणौनी।’

म्हणजे प्रातर्विधी वगैरे केल्याखेरीज घरातून बाहेर पडू नये. आणि नंतर बाहेर जाताना स्वच्छ, धुतवस्त्रे परिधान करून जावे. तसेच आपण घरात असताना कोणी बाहेर जावयास निघालाच, तर त्यास कोठे जातोस, असे कधी विचारू नये. त्याने सांगितले तर उत्तम; नाहीतर आपण विचारू नये, ही शिकवण तर आजही घराघरांत दिली जाते. रामदासांनी ती चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे.

‘बहुत अन्न खाऊं  नये। बहुत निद्रा करूं नये।

बहुत  दिवस  राहों  नये। पिसुणाचेथें।

आपल्याची  गोही  देऊं  नये। आपली  कीर्ती र्वणूं नये।

आपलें आपण हांसों नये। गोष्टी सांगोनी।’

मर्यादा आणि विवेक हे रामदासांसाठी नेहमीच विशेष महत्त्वाचे गुण राहिले आहेत. वरच्या श्लोकांतून तेच दिसून येते. पण यातला शेवटचा सल्ला जरा गमतीचा. आपलीच ग्वाही आपणच देऊ नये, आपलेच मोठेपण आपणच सांगू नये, हे ठीक. परंतु आपल्याच विनोदी प्रतिपादनाला आपणच हसत बसू नये, हे रामदास सांगतात ते मजेशीरच. असो.

हा संपूर्ण समासच अनेकदा वाचावा असा आहे. फक्त या सगळ्याकडे मोकळेपणाने पाहावयाची दृष्टी हवी. त्या अनुषंगाने रामदासांच्या याच समासातील एका श्लोकाने आजच्या लेखाची सांगता करू या.

‘मूर्खासीं समंध पडों नये। अंधारीं हात घालूं नये।

दुश्चितपणें  विसरों  नये। वस्तु आपुली।’

यातला ‘मूर्खासी समंध पडो नये..’ हा सल्ला कायमच लक्षात ठेवावा असा.

समर्थ साधक – samarthsadhak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2016 1:53 am

Web Title: shri dasbodh of shri samartha ramdas
Next Stories
1 घरी वाट पाहे राणी..
2 त्रयोदश भीमरूपी
3 हम तो बैरागी..
Just Now!
X