फ्रेडी डिकोस्टा-गोन्सालविस

पालमुडय़ो या पदार्थाचा नुसता उल्लेख जरी केला तर आज पन्नाशीत आणि त्याहून मोठे असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते. २०-२५ वर्षांपूर्वी कुपारी समाजातल्या सगळ्यांच्या घरात हा पदार्थ बनवला जायचा. मात्र अलीकडे क्वचितच हा पदार्थ खायला मिळतो. नाताळच्या दुसऱ्या दिवशी सामवेदी कुपारी संस्कृतीचा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यात पालमुडय़ो हा पदार्थ खाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात.

पाककृती

साहित्य –

तांदळाचे पीठ, उडीद डाळीचे पीठ, लाल भोपळा, गूळ, नारळ, वेलची, चवीनुसार मीठ, हळदीची किंवा भेंडीची पाने.

कृती –

सर्वप्रथम एका पातेल्यात तांदळाचे आणि उडीद डाळीचे पीठ घ्यायचे. त्यामध्ये लाल भोपळा, नारळ आणि गूळ किसून आणि चवीनुसार मीठ टाकून कणकेच्या पिठापेक्षा थोडे मऊ  मळून घेणे. त्यानंतर त्यामध्ये थोडे ईस्ट टाकून ठेवून द्यावे.

साधारण ५ ते ६ तासांनंतर पीठ वर आल्यावर त्यामध्ये थोडे वेलची पूड टाकून पुन्हा घोळवून घेणे.

त्यानंतर पिठाचे छोटे-छोटे गोळे करून ते हळदीच्या किंवा भेंडीच्या पानाच्या एका बाजूला थापणे. (जसे करंज्याचे सारण आपण पुरीवर ठेवतो.) त्यानंतर या पालमुडय़ा इडली पात्रामध्ये साधारणत: २० मिनिटांपर्यंत शिजवण्यासाठी ठेवणे.