फ्रेडी डिकोस्टा-गोन्सालविस

नाताळच्या सुट्टीनिमित्ताने अनेक जण आठवडाभराची सुट्टी घेतात. परदेशी राहणारी मुलंही घरी सुट्टीसाठी आलेली असतात. तेव्हा आठवडाभराच्या या सुट्टीत घरातील महिला वेगवेगळी पक्वाने करत असतात. याच पक्वानातलाच एक पदार्थ आहे तो म्हणजे हिंगोळ्यो. नाताळच्या पारंपरिक पदार्थामधील हा एक खास पदार्थ आहे. चण्याच्या डाळीने हा पदार्थ बनवला जातो. पुरणपोळीसाठी जसे सारण बनवले जाते, तसेच सारण या पदार्थासाठी बनवले जाते. वसईच्या कुपारी संस्कृतीमध्ये होणाऱ्या जावयाच्या किंवा सुनेच्या घरी गोडधोड घेऊन जायचे असेल तर या पदार्थाला पसंती दिली जाते. हिंगोळ्या या जास्त गोड बनवत नसल्याने लहान-थोरांना सगळ्यांनाच हे पक्वान आवडते.

पाककृती

साहित्य –

१ किलो चण्याची डाळ, दीड किलो गूळ, १२ ओले नारळ, २०० ग्रॅम तीळ, १ जायफळ, चवीनुसार मीठ, ३ किलो मैदा आणि तेल.

कृती –

* प्रथम सारण बनविण्यासाठी चण्याची डाळ वाफवून घेऊन ती कुस्करून घ्यावी. एका पातेल्यात गूळ वितळवून त्यामध्ये किसलेला नारळ सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा. त्यानंतर या मिश्रणात तीळ, कुस्करलेली डाळ, जायफळाचे कूट आणि चवीनुसार मीठ घालून ते एकजीव करावे म्हणजे आपले सारण तयार होईल.

* पुरी लाटण्यासाठी परातीत मैद्याचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, तेल घालून पीठ मळून घ्यावे. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून ते लाटून घ्यायचे. त्याच्या एका बाजूला एक चमचाभर म्हणजे पुरेसे सारण घालून दुसरी बाजू त्यावर वाळून कडा दाबून घ्यावी आणि तेलात तळून घ्यावी. तळण्याबरोबरच तव्यावर भाजलेल्या हिंगोळ्या या चवीला खूप छान लागतात.