09 August 2020

News Flash

वसईचा खाद्यठेवा : भंडारी समाजाचे चटकदार तिरपण

वसईत वसलेला विविध समाज आणि त्या त्या समाजातील खास पदार्थ हे या संस्कृतीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

अर्चना राऊत

मुबलक मासळी, फळे, भात अशी देणगी मिळालेल्या वसईचा इतिहास जितका जुना आहे, तितकीच जुनी या परिसरातील खाद्यसंस्कृतीही आहे. या खाद्यसंस्कृतीने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर, अवघ्या खाद्यजगताला वैशिष्टय़पूर्ण चवीचे पदार्थ मिळवून दिले. वसईचा हा खाद्यठेवा उलगडणारे हे पाक्षिक सदर आजपासून..

वसईत वसलेला विविध समाज आणि त्या त्या समाजातील खास पदार्थ हे या संस्कृतीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. प्रत्येक पदार्थ हे समाजाची ओळख आहे. त्या पदार्थामागे इतिहास आहे. बदललेल्या आणि पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीच्या अतिक्रमणात या पदार्थानी वसईचे समाजजीवन, संस्कृती टिकवली आहे.

वसई जशी निसर्गसौंदर्याने नटलेली आहे तशीच विविध समाजांतील विशिष्ट प्रकारच्या खाद्यसंस्कृतीनेदेखील समृद्ध झालेली आहे. प्रत्येक समाजात काही विशिष्ट खाद्य पदार्थ एखादया विशिष्ट सणाच्या दिवशी बनवला जातो. कोणताही पदार्थ विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट सणाला बनवण्यामागे काही तरी पाश्र्वभूमी असतेच. खाद्यपदार्थ बनवताना तेथील हवामान, भौगोलिक परिस्थिती जितकी महत्त्वाची तितकीच तो पदार्थ ज्या समाजात बनवला जातो त्या समाजाच्या चालीरीती, रीतिरिवाज देखील तितकेच महतत्त्वाचे!

वसईतील खाद्य संस्कृतीत महत्त्वाचा असणारा समाज म्हणजे भंडारी समाज होय. या समाजाने पूर्वापार चालत आलेल्या आपल्या खाद्यसंस्कृतीला आजतागायत जपलं आहे. चैत्र महिना सुरू झाला की भंडारी समाजात ‘चैताळ’ साजरी केली जाते. चैताळ साजरी करण्याचा उत्साह भंडारी समाजातील घराघरात पाहायला मिळतो. चैत्र महिन्यातील विनायकी चतुर्थीपासून चैताळ साजरी करण्यास सुरुवात होते. चैताळ म्हणजे आपल्या कुलस्वामिनीला नैवेद्य अर्पण करणे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी ओळखलं जाणारं एक शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. विनायकी चतुर्थीला तुळजाईला नैवेद्य अर्पण करून चैताळीला सुरुवात होते. अशाच प्रकारे अष्टमी, नवमी, चतुर्दशी या दिवशी आपापल्या कुलस्वामिनीप्रमाणे म्हणजेच एकविरा देवी, महालक्ष्मी देवी, हरबा देवी, वज्रेश्वरी देवी यांना नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य त्या त्या कुलस्वामिनीचे स्मरण करून घरातच दाखविला जातो. काही ठिकाणी गोडाधोडाचा नैवेद्य करतात तर काही ठिकाणी नैवेद्यात मांसाहारदेखील असतो.

गोडाधोडाच्या नैवेद्यात वरण-भात, खीर-पुरी, उडदाच्या डाळीचे वडे, भाजी, कोशिंबीर यांचा समावेश असतो तर मांसाहारात वरील पदार्थासोबत मटणाचा रस्सा, गावठी कोंबडय़ाचं सुकं मटण असतं. आणि या सर्व पदार्थामध्ये आपलं वेगळं स्थान पटकावतो तो पदार्थ म्हणजे ‘तिरपण’ होय. गावठी कोंबडय़ाच्या तिठा कलेजीपासून तिरपण तयार केले जाते. बनवायला अतिशय सोप्पा पण चवीला तितकाच रुचकर असा हा पदार्थ.

लहान मुलांपासून ते मोठय़ा माणसांना आवडणारा तिरपण हा पदार्थ आपण नुसता स्टार्टर म्हणून खाऊ  शकतो. चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही खूप छान लागतो. आवडत असल्यास लिंबू पिळून सव्‍‌र्ह केला तरी चालेल. तिरपण पदार्थ हा हॉटेलमध्ये मिळत नाही. वसईत सध्या काही भंडारी खाद्यपदार्थाची उपाहारगृहे निघाली आहेत. तिथे तिरपण मिळतो. वसईत जर कधी आलात तर भंडारी परिचितांकडे तिरपण खायला विसरू नका.

अस्सल वसईच्या अशाच वेगवेगळ्या पदार्थाचा इतिहास आणि त्यांच्या पाककृती घेऊन आता आपण दर पंधरवडय़ाने भेटणार आहोत. पुढचा खाद्यठेवा जाणून घेईपर्यंत तिरपणची लज्जत चाखून बघाच!

तिरपणची पाककृती

साहित्य:

पाव किलो तिठा कलेजी बारीक तुकडे करून, दोन मोठे चमचे तेल, १५ ते २० पाकळ्या लसूण बारीक ठेचून, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती :

एका कढईत तेल गरम करून घ्यावे. गरम तेलावर लसणाची खमंग फोडणी करावी आणि नंतर त्यात तिठा कलेजीचे तुकडे टाकावेत, दोन मिनिटे मिश्रण चांगले परतून घ्यावे व मग त्यात हळद, गरम मसाला, आणि चवीप्रमाणे मीठ घालून मंद आचेवर पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजून द्यावे. तिठा कलेजी शिजल्यावर वरतून कोथिंबीर पेरावी.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 3:28 am

Web Title: food culture in vasai area zws 70
Next Stories
1 तक्रारदार दाम्पत्यास पोलिसांकडून मारहाण?
2 प्रेयसीच्या घरात शिरण्यासाठी पाईपलाईन चढणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ला चोर समजून चोपलं
3 भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
Just Now!
X