05 August 2020

News Flash

वसईचा खाद्यठेवा : रवळी

रवळी ही वसईतील वाडवळ, भंडारी, पांचाळी समाजात दिवाळीतही बनवतात.

अर्चना निशांत राऊत

पूर्वी गाव म्हटलं म्हणजे बारा बलुतेदारी आली. याच बारा बलुतेदारांच्या समन्वयातून चालायचा गावचा कारभार किंवा प्रपंच. एकंदरीत काय, समाज किंवा एखादं गाव वसतं ते तेथील विविध पंथांतील, जाती-जमातींतील लोकांमुळे आणि त्यांच्या परंपरागत चालत आलेल्या संस्कृतींमुळे. या गोष्टीला आमची वसईही अपवाद नाही. कोकण पट्टीत येणारी वसई विविध फुलझाडे, फळझाडे, नारळाच्या बागा, केळीच्या बागा, भातशेती, ताडी-माडीची झाडे, अथांग समुद्रकिनारा यांनी संपन्न झाली आहे. निसर्गाने मुक्त हाताने वसईवर फुला-पानांची उधळण केली आहे आणि याच नैसर्गिक साधनसंपत्तीला जपत आणि समृद्ध करत आला आहे, वसईतील वाडवळ, भंडारी, ख्रिस्ती, आगरी, कोळी, पांचाळी समाज. या विविध समाजांतील वैशिष्टय़े त्यांच्या खाद्यसंस्कृतीतून आणि चालीरीतीतून पाहावयास मिळतात.

वसईत पूर्वापार चालत आलेला एक सर्वाच्या आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे रवळी. नाव थोडं वेगळं वाटेल, पण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा हा पदार्थ लागतो. ज्या गृहिणीला हा पदार्थ उत्तम बनवता येतो, तिला सुगरण म्हणण्यास काही हरकत नाही. तसं पाहायला गेलं तर वसईतील आमची प्रत्येक गृहिणी ही सुगरणच आहे आणि त्यांच्यामुळेच वसईची खाद्यसंस्कृती आजतागायत जपली आहे.

वाडवळ समाजात बारशाच्या दिवशी रवळी बनवली जाते. पूर्वी पेढा-बर्फी यांचे फार अवडंबर नसावे. त्यामुळेच बारशाला पारंपरिक पद्धतीची रवळी आणि उकडीचे मोदक केले जायचे आणि अजूनही केले जातात. त्याच्यामागे अजूनही एक भावना कदाचित असावी की, मुलगी असेल तर रवळी आणि मुलगा असेल तर मोदक. म्हणजे आज आपण नाही का मुलगी असेल तर बर्फी आणि मुलगा असेल तर पेढे आणतो तसाच काहीसा प्रकार. रवळी बनवताना वापरला जातो गूळ, तांदळाचा रवा, नारळाचे दूध, साजूक तूप म्हणजेच घरच्याच उपलब्ध जिन्नसातून गोडधोड बनवून सणवार, समारंभ साजरे व्हायचे. त्यामुळे कसं नातेसंबंधातही गोडवा येऊन नाती वृद्धिंगत होत असत. रवळी ही वसईतील वाडवळ, भंडारी, पांचाळी समाजात दिवाळीतही बनवतात. काही ठिकाणी ही धनतेरसला बनवतात तर काही ठिकाणी नरकचतुर्दशी किंवा बलिप्रतिपदेला बनवली जाते. रवळी बनवण्याचे कारण काहीही असू द्या, हेतू मात्र एकच असतो, रवळीचा गोडवा वसईतील मातीत कायमचा राहावा.

रवळी बनवण्याची कृती

* साहित्य : १ वाटी तांदळाचा रवा, २ वाटी साजूक तूप, २ वाटी गूळ, ३ वाटी नारळाचे दाटसर दूध, १ चमचा वेलची पावडर, १ चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, आवडीनुसार चारोळी आणि काजू-बदामाचे काप, चिमूटभर मीठ.

* कृती : एका जाडसर बुडाच्या पातेल्यात अर्धी वाटी तूप टाकून रवा बदामी रंगावर भाजून घेणे. दुसरीकडे एका पातेल्यात नारळाच्या दुधात गूळ चांगला विरघळून घेऊन त्या दुधाला एक उकळी काढणे. उकळी येईपर्यंत गूळमिश्रित दूध सतत ढवळत राहावे. उकळी आलेले दूध ज्या पातेल्यात रवा भाजून घेतला आहे, त्यात घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत मस्तपैकी परतून घेणे. त्याच दरम्यान त्यात वेलची पावडर, जायफळ पूड, सुंठ पावडर, चारोळी आणि काजू-बदामाचे काप, उर्वरित साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालणे. त्यानंतर एक दोन मिनिटे हे मिश्रण चांगले एकजीव करून शिजवून घेणे. पातेल्याच्या वर झाकण ठेवून त्यावर कोळशाचे निखारे ठेवावेत आणि मंद आचेवर रवळीला दहा ते पंधरा मिनिटे खमंग शिजू द्यावे.

रवळी थंड झाल्यावर एका ताटात पातेले उपडे करून केकप्रमाणे त्याचे तुकडे करावेत. ही रवळी आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी खावी. खूपच चविष्ट लागते.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 2:01 am

Web Title: food from vasai culture food culture in vasai zws 70
Next Stories
1 भिवंडीतील पूर्णा गावात गोदामाला भीषण आग
2 Video : डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी, महिलेलाही जबर मारहाण
3 दिवाळीनिमित्त ठाणे, डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
Just Now!
X