News Flash

कसे बनवायचे बाजरीचे वडे? | How to make Bajri wada

बनवायला अत्यंत सोपा पदार्थ

Bajri Wada : बाजरी वडा

दिवाळीचा हंगाम आहे. घराघरातून दिवाळीच्या फराळाचे खमंग वास दरवळत आहेत. घरोघरच्या गृहिण्या नोकरी सांभाळून, मुलाबाळांचे डबे करून, घरची व्यवधानं सांभाळून चमचमीत फराळ करण्यात गुंतल्या आहेत. अर्थात, हा हंगाम बोनसचा आणि जादा कामाचाही आहे. बिझनेस करणाऱ्यांना जास्त वेळ ग्राहकांची सेवा करावी लागत आहे, तर नोकरदारांनाही नंतरच्या सुट्यांची भरपाई म्हणून आत्ताच कामे पूर्ण करायची आहेत. थोडक्यात, दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सगळ्यांची आत्ता भरपूर धावपळ चालली आहे. `आज मला office मध्ये जरा जास्त काम आहे, उद्या मी तुला नक्की मदत करतो,` असं आश्वासनही अनेक पतिराजांनी या काळात आपल्या पत्नीला दिलं असेल. काही जणांना द्यायची इच्छा असेल, तर काही पत्नींनी स्वतःच ते गृहीतही धरलं असेल. पण आश्वासन पाळणं प्रत्येक वेळी जमतंच, असं थोडंच आहे? त्यात काही ना काही विघ्नं येत राहतात. अर्थात, काही वेळा ही विघ्नं खरंच टाळण्यासारखी असतात, काहीवेळा सोयीस्करपणे आणली जात असतात. तर, यापैकी कुठल्याही कारणानं जर पत्नीच्या कष्टांना हातभार लावायला जमला नाही, तर तिचा रोजचा इतर कामांचा भार हलका होईल, यासाठी तरी नक्की प्रयत्न करावेत. उदाहरणार्थ, आपण घरी असू किंवा लवकर घरी आलेले असू, तर तिच्याकडून चहाची अपेक्षा न करता स्वतःच तिला चहा करून द्यावा. घरातली आवराआवरी, सजावट यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा. मुख्यतः `ते अमकं कुठे ठेवलं आहेस?`, `त्या तमक्याची जागा कुणी बदलली?` असे प्रश्न विचारून, आधीच त्रासलेल्या पत्नीला आणखी उचकवू नये. आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी एखादा छानसा पदार्थ करून तिला खाऊ घालावा आणि `मी आज फराळ करून दमलेय, रात्री फक्त मुगाच्या डाळीची खिचडी करेन,` या संभाव्य संकटातून स्वतःची सुटका करून घ्यावी. असाच एक अगदी सोपा, प्रत्येकाला करता येण्यासारखा पदार्थ यावेळी बघूया. स्वयंपाक केल्याची फुशारकीही मारता येईल आणि तिला मदत केल्याचं पुण्यही पदरात पडेल. स्वतःची वेगळं खायची हौसही भागेल. एका वड्यात तीन पक्षी!

साहित्य


 • दोन वाट्या बाजरीचे पीठ
 • मिरचीचा ठेचा / लाल तिखट
 • हिंग
 • मीठ
 • जिरे
 • कोथिंबीर
 • तेल
 • हळद
 • तीळ

पाककृती


 • प्रथम परातीत वरील सर्व साहित्य एकत्र करून कालवावे.
 • पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावे.
 • प्लॅस्टिकवर तेलाचा हात लावून पुरीच्या आकाराचे छोटे वडे थापून गरम तेलात तळून काढा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे

एकूण वेळ : ३५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:15 am

Web Title: how to make bajri wada maharashtrian recipe
Next Stories
1 कशी बनवायची शेव रस्सा भाजी? | How to make Shev Bhaji
2 कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा? | How to make Moong Halwa
3 कसे बनवायचे मक्याचे कटलेटस?
Just Now!
X