[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. शिदोरी म्हणून बरोबर घेऊन जाण्यासाठी बाकरवडीसारखा दुसरा चांगला पर्याय नसतो. आपापल्या गावाला गेल्यानंतर पुण्याची बाकरवडी घेऊन आलो, हे सांगणं हाही अभिमानाचा एक भाग असतो. पाहुण्याला बाकरवड्या योग्य वेळेत मिळवून देणं, हाही काही वेळा अस्मितेचा प्रश्न ठरू शकतो. कारण मानबिंदू वगैरे असला, तरी तो ठराविक वेळेत मिळणार, ठराविक दिवशी मिळणार नाही, हे पुण्याचं वैशिष्ट्य जपणं, हाच स्वाभिमान असतो. काही पदार्थ ठराविक ठिकाणी, ठराविक दुकानात खाणं इष्ट असतं. त्याबाबतीत प्रयोग करता येत नाहीत आणि त्यातून अनेकदा निराशाच पदरी पडते. मात्र, हे पदार्थ घरी करून बघितले, तरी त्याचा अनुभव रंजक ठरू शकतो. मिसळीचा तर्रीबाज रस्सा हा कळकट हॉटेलातच ओरपायचा प्रकार असला, तरी घरचा प्रयोगही अगदीच वाईट होत नाही. बाकरवडीचंही तसंच आहे. कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम बाकरवड्या तयार झाल्याच! फक्त मैदा, बेसन असे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते आरोग्यालाही चांगलं असतं. त्यामुळे घरी किंवा बाहेर बाकरवड्या किती हादडायच्या, हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make bhakarwadi maharashtrian recipes
First published on: 06-01-2017 at 01:15 IST