19 November 2017

News Flash

कशी करायची क्रिस्पी भेंडी? | How to make Crispy Bhindi

नावडत्या भेंडीचा आवडता चटपटीत पदार्थ

पुणे | Updated: January 25, 2017 1:15 AM

Crispy Bhindi : क्रिस्पी भेंडी

आजी बऱ्याच दिवसांनी घरी राहायला आली होती, त्यामुळे नातवंडं सकाळपासून तिलाच लटकत होती. आजीच्या निमित्ताने दोघांनीही शाळेला दांडी मारली होती. त्यासाठी अंग दुखण्यापासून ते शाळेच्या व्हॅनवाल्या काकांच्या संपापर्यंत सगळी कारणं सांगून झाली होती. निदान दोन दिवस तरी मनसोक्त आजीबरोबर राहायला मिळणार, तिच्या हातचे पदार्थ खायला मिळणार, याचा आनंदच मोठा होता. दिवसभरात आजीबरोबर काय करायचं, याच प्लॅनिंग आठ दिवस आधीच झालं होतं. त्यात बाहेर फिरायला जाणं, आईस्क्रीम खाणं, एखाद्या बागेत जाणं, गोष्टी सांगणं ह्या सगळ्यांचा समावेश होता. आजीलाही नातवंडांबरोबर रमण्याचा आनंद जास्त होता. त्याच ओढीने ती घरी आली होती. सगळ्यात विशेष कार्यक्रम होता तो आजीच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा. हल्ली बरेच दिवस आजोळची सैर घडली नव्हती, त्यामुळे आजीच्या हातचं खायलाच मिळालं होतं. यावेळी आजी कितीही दमलेली असली, तरी तिला गळ घालून काहीतरी वेगळं करायला लावायचंच, हेही त्यांनी आधीच ठरवून टाकलं होतं. आजी साधेच पदार्थ वेगळ्या पद्धतीने करते, हे मुलांनी बरेच वर्षं ऐकलं आणि अनुभवलंही होतं. अर्थातच मुलांच्या आईलाही त्याबद्दल काही आक्षेप नव्हताच. आजी येणार म्हटल्यावर आपल्याला स्वयंपाकघरातून दोन दिवस सुट्टी, हे तिनं गृहीतच धरून त्यानुसार आपल्या मैत्रिणींच्या भेटीगाठी, रीयुनियन वगैरे कार्यक्रमही आधीच ठरवून टाकले होते. त्यामुळे आजीला आता नकार देणं शक्यच नव्हतं. `काहीतरी वेगळं कर` म्हणजे काय, हे कोडं काही सुटत नव्हतं. आईच्या रोजच्या बंधनांपासूनही आज सुटी मिळणार होती. खरंतर आईच्या वेळापत्रकानुसार आज भेंडीचा वार होता, पण आजीमुळे ती सवलत नक्की मिळेल, याची मुलांना खात्री होती. हो नाही करता करता शेवटी आजीनं एक वेगळीच डिश केली. आजीनं एखाद्या झकास हॉटेलसारखी स्टार्टरची चमचमीत डिश केली, म्हणून मुलं जामच खूश झाली. संध्याकाळी आजीला आईशी बोलताना मात्र, `आज मुलांनी भेंडीसुद्धा आवडीनं खाल्ली गं!` असं बोलताना त्यांनी ऐकलं, तेव्हा मात्र त्यांची तोंडं भेंडीसारखीच बुळबुळीत झाली.

साहित्य


 • १५ भेंडी, मध्यम आकाराच्या
 • २ चमचे बेसन
 • १ चमचे तांदूळ पीठ
 • अर्धाचमचा आले लसूण पेस्ट
 • १ चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • पाव चमचा जिरेपूड
 • चवीपुरते मीठ
 • तळण्यासाठी तेल
 • चवीनुसार चाट मसाला

पाककृती


 • भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.
 • एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत आणि त्यात आले लसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पीठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे.
 • कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाट मसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभुरावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

एकूण वेळ : ५० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्टार्टर

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 25, 2017 1:15 am

Web Title: how to make crispy bhindi maharashtrian recipes