19 November 2017

News Flash

कसा करायचा डाळवडा? | How to make Dal Vada

खुसखुशीत, खमंग आणि चवदार

पुणे | Updated: January 7, 2017 1:15 AM

Dal Vada : डाळ वडा

“या घरात पुन्हा हरभरा डाळ शिजली, तर बघ. मी घरात कायमचं जेवणं बंद करेन!“ त्याच्या धमकीनं घर हादरलं. एरव्ही यावेळी दंगामस्ती करून घर डोक्यावर घेणारी मुलंही शांत बसली. हा राग हरभरा डाळीवरचा नाही, तर साहेबांवरचा आहे, हे तिच्या लक्षात आलं होतं, पण त्यावेळी तसं बोलून दाखवण्याची सोय नव्हती. शिवाय, क्षुल्लक कारणावरून रागावलेल्या माणसाचा राग शांत करण्यासाठी काहीतरी गमतीदार बोलणं हाही त्यावेळेपुरता त्याचा `भयंकर अपमान, अस्मितेला धक्का, स्वाभिमानावर घाला` वगैरे असतो, याची तिला लग्नाला दहा वर्षं झाल्यानंतर कल्पना आली होती. `कायमचं जेवण बंद करणारेस, की जेवण कायमचं बंद करणार आहेस,` अशी कोटी करायचा मोहसुद्धा तिनं टाळला. अन्यथा घरात भूकंप होण्याची शक्यता होती. हरभरा डाळीला बळीचा बकरा बनविण्यात आलं असलं, तरी हा फक्त साहेबांवरचा राग नव्हता. हरभरा डाळीचाही त्या रागात खारीचा वाटा होताच. लग्न झाल्यापासून पहिला सण असो किंवा दिवाळसण, कुठल्याही दिवशी त्याला घरी, सासरी, सासरच्या सगळ्या नातेवाइकांकडे फक्त पुरणाच्याच पोळ्या खायला लागल्या होत्या. जगातल्या बाकीच्या सगळ्या गोडाच्या पदार्थांवर बंदी आली की काय, अशी शंका त्याला आली होती. त्यानं ती बोलून दाखवली, तेव्हा मात्र तिनं त्याच्याशी महिनाभर अबोला धरला होता. शेवटी हरभरा डाळीला आणि माहेरच्यांना काही टोमणे मारणार नाही, अशी कबुली दिल्यानंतर समेट झाला होता. आता दिवस आणि वर्ष पालटली, तशी परिस्थिती बदलली. तरीही हरभरा डाळ काही आपल्याला झेपत नाही, हे त्याचं मत ठाम होतं. पुरण, पुरणाची पोळी, कटाची आमटी, वाटली डाळ, यातलं काही काही म्हणून खायचं नाही, असं त्यानं ठरवलं होतं. त्या दिवशी म्हणूनच घरात पुरणाच्या पोळीचा वास आला आणि आफिसचा राग घरी निघाला. काही काळ असाच शांततेत गेला. जेवताना तिनं केलेले सात-आठ वडे त्यानं मटकावले, तेव्हा कुठे जरा त्याचा आत्मा आणि डोकं शांत झालं. कधी नव्हे ते त्यानं तिचं कौतुकही केलं. “मग? आवडले ना, हरभऱ्याच्या डाळीचे डाळवडे? थोडी डाळ ठेवलेय मी! उद्या पुरणपोळ्या करण्यासाठी!“ तिनं कोपरखळी मारली आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला.

साहित्य


 • १ वाटी हरभरा डाळ
 • ५ ते ६ हिरव्या मिरच्या
 • ८ ते १० लसूण पाकळ्या
 • १ इंच आले
 • १० ते १५ कढीपत्ता पाने
 • १/२ टिस्पून हळद
 • १ टिस्पून जीरे
 • १ टिस्पून तीळ
 • १/२ कप कोथिंबीर, बारीक चिरून
 • तळण्यासाठी तेल
 • चवीपुरते मीठ

पाककृती


 • हरभरा डाळ धुवून २ ते ३ तास भिजवावी.
 • भिजल्यावर चाळणीत ओतून अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निथळून निघून जाईल.
 • मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
 • वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जिरे घालून मिक्स करावे.
 • कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
 • गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व्ह करावा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिट (डाळ भिजवण्याचा वेळ वगळून)

एकूण वेळ : ३५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तीसाठी (१५ ते १८ वडे)

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 7, 2017 1:15 am

Web Title: how to make dal vada maharashtrian recipes