X

कसे करायचे उपवासाचे बटाटे वडे?

उपवासासाठी एकदम हटके डिश

आपल्या देशात उपास ही नुसती करायची नाही, तर साजरी करायची गोष्ट आहे. एकादशी, दुप्पट खाशी ही म्हण उगाच नाही आलेली. त्यामागे एक तत्त्वज्ञान आहे, काही विचार आहे. जुन्या म्हणी खऱ्या करून दाखवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणी, वाक्प्रचार हे कुठल्याही भाषेचं वैशिष्ट्य असतं. आपल्या भाषेत तर म्हणींचं भांडार आहे. या म्हणी लोकांच्या वागण्यावरून पडलेल्या नाहीत, तर कुणीतरी त्या म्हणी तयार केल्या आणि आपली संस्कृती, परंपरा जपण्यासाठी लोक इमानेइतबारे त्याचं पालन करतात किंवा आपल्या वागण्याबोलण्यात त्याच्या अनुसार बदल करतात, असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. आधी पोटोबा मग विठोबा, एकादशी दुप्पट खाशी, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशा म्हणींचं `पोटॅं`शिअल लोक किती सार्थ करतात, हे किती जागोजागी, क्षणोक्षणी जाणवतं ना? उपास करणारे लोक म्हणूनच धार्मिक असण्यापेक्षा संस्कृतीचे पाईक जास्त वाटतात. उपास न करणाऱ्या लोकांची तर आणखीच वेगळी तऱ्हा असते. उपास न करणं हा त्यांनी सोयीनं निवडलेला पर्याय असतो. उपासाचेच पदार्थ खाण्याचं बंधन राहत नाही, हवं ते खाता येतं, गरज वाटली तर उपासाचे पदार्थही खाता येतात. अगदी उदाहरणच द्यायचं झालं, तर मद्यपानाच्या कार्यक्रमात मद्यपान न करणारेच जसे चाकण्याचं बिल वाढवतात, तसंच उपास न करणाऱ्यांचं असतं. उपास असलेल्यांसाठी केलेले पदार्थ तेच जास्त मटकावत असतात. वर त्यांचा उपास नाही म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे रांधायला लागतं, ते वेगळंच. तर याच निमित्ताने आज बघूया उपास करणाऱ्यांना खाता येईल आणि उपास नसणाऱ्यांना उगाच उपास केल्याचा फील येणार नाही आणि मनसोक्त खाताही येईल, असा पदार्थ.

साहित्य


 • सारणासाठी
 • १०-१२ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
 • एक कच्चा बटाटा – किसून
 • आले
 • हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • साखर
 • दोन चमचे शेंगदाण्याचे कूट
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • ७-८ कढीपत्त्याची पाने
 • चार टेबलस्पून खोवलेले ओले खोबरे
 • दोन चमचे लिंबाचा रस
 • पारीसाठी साहित्य
 • अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ
 • अर्धी वाटी शिंगाड्याचे पीठ
 • अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ
 • मीठ चवीनुसार
 • एक टेबलस्पून तेल

पाककृती


 • उकडलेले बटाटे सोलून घ्या व स्मॅश करून ठेवा.
 • एका बाऊलमध्ये बटाट्याचा लगदा, आले, हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, खोवलेले खोबरे, व लिंबाचा रस एकत्र करून हे सर्व मिश्रण एकजीव करा.

  आता या मिश्रणाचे गोल चपटे वडे थापून ठेवा.
 • नंतर एका बाऊलमध्ये राजगिरा, शिंगाडा व साबुदाणा ही सर्व पीठे एकत्र करून त्यात पाणी घालून ओलसर पीठ बनवा.

  या पीठात मीठ, मिरचीचा ठेचा व एक किसलेला कच्चा बटाटा घाला.
 • दुसरीकडे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा.
 • तेल पुरेसे गरम होताच त्यातील एक टेबलस्पून कडकडीत तेल काढून पारीसाठी सरबरीत केलेल्या पिठात घालून मिश्रण एकजीव करा.
 • आता वडे सरबरीत पिठात सगळीकडून छान घोळवून घ्या व कढईतील गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.

  गरमागरम वडे कोथिंबीर-खोबर्‍याच्या हिरव्या किंवा खजुर-चिंचेच्या आंबट-गोड चटणी सोबत सर्व्ह करा.

First Published on: January 2, 2017 1:15 am
Outbrain