19 November 2017

News Flash

कसं करायचं हिरवं मटण? | How to make Green Curry Mutton

मांसाहारप्रेमींसाठी एक वेगळी, झणझणीत डिश

पुणे | Updated: January 4, 2017 1:15 AM

Green Gravy Mutton : हिरवं मटण

घरातले सगळे खवय्ये, विशेषतः मांसाहारप्रेमी असतील, तर दोन गोष्टी घडू शकतात. घरातल्या कर्त्या गृहिणीला घरच्यांची आवडनिवड जपण्यासाठी रोज नवीन काय करायचं, असा प्रश्न पडू शकतो किंवा रोज वेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करण्याचा, त्यात भरपूर नवनवीन प्रयोग करून बघण्याचा उत्साह येऊ शकतो. गृहिणी जर अस्सल स्वयंपाकप्रेमी असेल, तर तिला नक्कीच हा दुसरा पर्याय अतिशय प्रिय असतो. स्वयंपाक करणं हे एक कष्टाचं काम आहे, हे खरंच. पण आपण केलेला स्वयंपाक आपली सगळी जवळची माणसं बोटं चाटून गट्टम करतात, तेव्हा स्वयंपाकाचे सगळे कष्ट पळून जातात. अर्थात, स्वयंपाकासाठी लागणारे कष्ट, त्यामागची मेहनत, योग्य पदार्थ योग्य प्रमाणात बनविण्याची हातोटी, तो वेळेत तयार करण्याची कला, याचं कौतुक तर व्हायलाच हवं. फक्त मिटक्या मारत एखादा पदार्थ खाल्ला, यावरून गृहिणीला तिच्या कलेची शाबासकी मिळाली, असं म्हणण्यात काही खरं नाही. हे म्हणजे शाळेत मुलांनी अभ्यासात, खेळात चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांना फक्त वरच्या वर्गात ढकलण्यासारखं झालं. ते तर अपेक्षितच असतं. कुठल्याही गृहिणीला अपेक्षित असतात ते तिच्या पाककलेबद्दल प्रेमाचे दोन शब्द. ज्या गृहिणींना ते मिळतात, त्या अधिक उत्साहाने नवीन पदार्थ करण्याच्या मोहिमेला लागतात. ज्यांच्या वाट्याला हे कौतुक येत नाही, त्या पुढच्या वेळी नवऱ्याला किंवा घरातल्या इतर कुणाला कामाला लावतात. बायकोच्या आग्रहाखातर, नाइलाजानं नवऱ्यानं खूप कष्टानं केलेल्या एखाद्या साध्या पदार्थाचंही कौतुक झालं नाही, की मग त्याची जी चिडचीड होते, ती पाहण्यासारखी असते. ज्या गृहिणींच्या वाट्याला कौतुक येतं, त्यांच्यासाठी आजची ही एक वेगळी रेसिपी.

साहित्य


 • १ किलो मटण
 • वाटणासाठी
 • अर्धा किलो कांदे
 • आलं (४ ते ५ छोटे तुकडे)
 • एका लसणीच्या पाकळ्या
 • ७ ते ८ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी चिरलेली कोथिंबीर
 • १ चमचा खसखस
 • ५ लवंगा
 • ८ काळी मिरी
 • ५ दालचिनीचे तुकडे
 • २ चमचे बडीशेप
 • जायफळाचा तुकडा
 • एक वाटी तूप
 • फोडणीसाठी दोन लवंग
 • दालचिनीचे दोन तुकडे
 • २ वेलची
 • १ वाटी ओल्या खोबऱ्याचा रस

पाककृती


 • तूप तापवून त्यात लवंग, वेलची, दालचिनी घालून कांदा घालावा.
 • वाटलेल्या मसाल्याची गोळी मटणाला लावून ठेवावी.
 • कांदा चांगला परतला गेल्यानंतर त्यात मटण घालून परतावे.
 • नंतर थोडी हळद, मीठ आणि पाणी घालून शिजवावे.
 • शेवटी खोबऱ्याचा रस घालावा.
 • मटणाएवढाच अंदाजे रस ठेवावा
 • कूकरमध्ये शिजवायचे असेल, तर ३ शिट्ट्या कराव्यात.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ४५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे

एकूण वेळ : एक तास १० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : जेवणातील भाजी

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 4, 2017 1:15 am

Web Title: how to make green curry mutton maharashtrian recipes