X

कशा करायच्या गुळाच्या पोळ्या? | How to make Gul Poli

संक्रांतीनिमित्त घरोघरी तयार होणारा आवडीचा गोडाचा पदार्थ

गुळाची पोळी आणि पुरणाची पोळी या जत्रेत हरवलेल्या सख्ख्या बहिणी आहेत. आधी कुठल्या पोळीचा शोध लागला, याच्यावर वाद होऊ शकेल, पण पुरणाची पोळी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. म्हणूनच ती थोरली बहीण मानायला हरकत नाही. थोडक्यात, पुरणाच्या पोळीचं लताबाईंसारखं आहे. त्यांची थोरवी वादातीत आहेच, पण म्हणून धाकट्या बहिणीचं कर्तृत्वही कमी आहे, अशातला भाग नाही. दोघींची तुलना होऊ शकत नाही, दोघींमध्ये कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरवता येऊ शकत नाही. तरीही धाकटीवर नाही म्हटलं तरी अन्याय झालाच, ही भावनाही कमी होत नाही, हेही तेवढंच खरं. तर सध्या तरी आपण गुळाच्या पोळीबद्दल बोलूया. गुळाच्या पोळीसारखा खमंग आणि खुसखुशीत गोडाचा पदार्थ नाही. त्यातून त्यात घातलेले पांढरे तीळ, तव्यावर भाजल्या गेलेल्या गुळाचा खरपूस वास आणि वरून तुपाची धार, असा सगळा जामानिमा असला, की जेवायला दुसऱ्या कुठल्याच तोंडी लावण्याची गरज लागत नाही. गुळाची पोळी करण्याचा व्याप पुरणाच्या पोळीएवढाच, किंबहुना काकणभर जास्तच. तरीही पुरणाची पोळी करता येणं, म्हणजे पाककौशल्याची इतिश्री, हा समज काही बदलत नाही. मुलीला एकवेळ नवऱ्याला सांभाळता येत नसेल, तरी चालेल, पण तिला पुरणाची पोळी करता आली पाहिजे, ही कांदेपोहे कार्यक्रमातली एक समाजमान्य अट मानली जाते. प्रत्यक्षात मात्र, गुळाची पोळीच पुरणाच्या पोळीला जरा भारी पडते, हे सत्य कुणी नाकारणार नाही. सणासुदीला पुरणाची पोळी जेवढ्या प्रेमानं केली जाते, तेवढी माया बिचाऱ्या गुळाच्या पोळीला लाभत नाही. तिचा मान संक्रांतीपुरता. असो. संक्रांतीनिमित्त आज शिकूया, गुळाच्या पोळीची रेसिपी.

साहित्य


 • सारणासाठी
 • १ वाटी किसलेला गूळ
 • पाव वाटी बेसन व कणीक मिळून घ्या
 • तीळ, खसखस भाजून केलेली पूड पाव वाटी
 • दीड टे.स्पून साजूक तूप व तेल मिळून घ्या.
 • वेलदोडे-जायफळ पूड पाव चमचा
 • पारीसाठी
 • दीड वाटी न चाळलेली कणीक
 • पाव वाटी मैदा
 • पाव वाटी बारीक चाळलेलं बेसन

पाककृती


 • तेल व तूप गरम करून त्यात बेसन व कणीक खमंग भाजा.
 • गॅस बंद करून इतर साहित्य घाला.
 • थंड झाल्यावर त्यात किसलेला गूळ घालून चांगले एकजीव करा.
 • कणीक, मैदा आणि बेसन एकत्र करावे.
 • दोन टे.स्पून कडक तेलाचं मोहन घाला.
 • घट्टसर कणीक भिजवा
 • पोळ्या करतांना दोन कणकेच्या लाट्यांमध्ये एक गुळाची लाटी ठेवा
 • गूळ घट्ट वाटल्यास दुधाच्या हाताने मऊ करा.

First Published on: January 12, 2017 1:15 am
Outbrain