X

कशी करायची खमंग कचोरी? How to make Khamang Kachori

चमचमीत आणि मस्त पदार्थ

कुठलाही नवा ऋतू आला, की बदलत्या हवामानापेक्षा जास्त काळजी वाटते, ती बदलत्या हवामानाची काळजी घ्या, अशा सूचनांची. बदलत्या हवामानामुळे जेवढा त्रास होत नाही, तेवढा अशा सूचनांचा होतो. बाहेर खाणं-पाणी टाळा, जास्त उष्ण, जास्त थंड पदार्थ खाऊ नका, वेळेत जेवा, सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या, झोपायच्या आधी दोन तास जेवा किंवा जेवल्यानंतर दोन तास झोपू नका, दिवसभरात पुरेसं पाणी प्या, भूक असेल तेवढंच आणि तेव्हाच खा, साधारण ह्याच सूचना सार्वकालिक असतात, पण त्या दरवेळी नित्यनेमानं द्यायची प्रथा असते. दरवेळी आपण काहीतरी नवीन सांगितलं आहे, असं भासवून द्यायचं असतं, त्यामुळेच कधीकधी असे सल्ले आणि सूचना देणाऱ्यांचा त्रास जास्त वाटतो. खरंतर असे सल्ले देणाऱ्यांचा हेतू वाईट नसतो, त्यांच्या मनोरंजनाच्या आणि जगण्याचा आनंद घेण्याच्या कल्पनांमध्ये काहीतरी केमिकल लोच्या असतो. ते सूचना चांगल्या मनानं करतात, पण त्यामुळे त्या त्या हवामानाला साजेसं काहीतरी खाण्याचा खवैयांचा आनंद मारला जातो. तर सांगायचा उद्देश काय, की आपल्याला हवं ते खावं. अर्थात, प्रमाणात खावं. खाण्याचे नियम धुडकावण्यात मजा आहे, पण आपल्या तब्येतीची काळजी आपणच घेण्यात जास्त शहाणपणा आहे. विशेषतः डॉक्टरांच्या सूचना न पाळता काहीतरी खायचं असेल, तर ते डॉक्टरांना समजणार नाही, इतपत काळजी घेतली, की काम भागलं. अनेकदा तोच संयम पाळला जात नाही आणि मग डॉक्टरांकडून ओरडा खाण्याची वेळ येते. नमनाला एवढं घडाभर तेल ओतल्यानंतर, आज एका चमचमीत पदार्थाची ओळख करून घेऊया. आज शिकूया, मस्त खमंग कचोरी.

साहित्य


 • पाऊण वाटी उडीद डाळ तास भर आधी भिजत ठेवावी
 • १ चमचा बडिशेप
 • पाव चमचा हिंग पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • ४ लवंगा, १ वेलदोडा
 • आठ मिरे
 • १ चमचा सुंठपुड
 • अर्धा चमचा पादेलोण
 • १ चमचा धणे
 • १ चमचा तिखट
 • ओवा, मीठ चवीनुसार
 • तेल २ चमचे
 • मैदा आणि रवा मिळून पाव किलो

पाककृती


 • एका प्लेट मध्ये रवा व मैदा, ओवा, मीठ, तेल घालून भिजवा.
 • भिजवलेली डाळ सर्व मसाले घालून वाटून घ्या.
 • थोड्या तेलावर हिंगाची फोडणी करून हे मिश्रण परतून घ्या.
 • मैद्याचे छोटे गोळे तयार करून घ्या.
 • मिश्रण पारीत भरून, लाटून गोल आकार द्या.
 • कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरीत होईपर्यंत कचोरी लालसर होईपर्यंत तळावी.

First Published on: December 30, 2016 1:15 am
Outbrain