News Flash

कशी बनवायची कोफ्ता करी? | How to make Kofta Curry

चवदार आणि तितकीच पौष्टिक डिश

Kofta Curry : कोफ्ता करी

[content_full]

दुधीभोपळा म्हणजे एखाद्या दंगेखोर मुलांच्या वर्गातला गरीब बिच्चारा, साधाभोळा, कुणाच्या अध्यात मध्यात नसलेला मुलगा. वर्गातल्या मागच्या बाकावर, कुणाला त्रास होणार नाही आणि कुणाचं लक्षही जाणार नाही, अशा जागेवर गपचूप बसलेला विद्यार्थी. वर्गातले कांदे, बटाटे, टोमॅटो ही मुलं सगळ्यात हुशार आणि तेवढीच दंगेखोर. अख्ख्या वर्गावर त्यांचाच दाब चालतो. प्रत्येक उपक्रमाच्या वेळी ती पुढे. प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचंच नाव आधी घेतलं जातं. कधी घेतलं नाही, तर ती एवढा दंगा घालतात, की त्यांना काहीही करून सहभागी करून घ्यावंच लागतं. मधल्या बाकांवर बसणारी फ्लॉवर, काकडी, गाजर, कोबी, बीट, ढोबळी मिरची, मटार वगैरे मंडळी थोडी कमी हुशार आणि त्यांच्यापेक्षा कमी दंगेखोर. ती असली तरी चालतं, नसली तरी विशेष काही अडत नाही, अशा गटातली. वर्गात जागा मिळाली नाही, म्हणून त्यांच्या आणखी मागे बसणारी मेथी, पालक, चाकवत, फरसबी, गवार, लाल भोपळा वगैरे मंडळी खरंतर हुशार, गुणवत्तावान. पण त्यांना सारखं कुणाच्या पुढेपुढे करायची खोड नाही. स्वतःचा आब राखून राहायची सवय. त्यामुळे विशेष प्रसंग असेल, तरच त्यांना निमंत्रण. त्यावेळी मात्र इतर कुणी त्यांच्या कार्यक्रमात लुडबूड करण्याची गरज नाही. दुधीभोपळा हा प्राणी मात्र पहिल्यापासूनच गरीब. लाल भोपळा कितीही नावडता असला, तरी बिचाऱ्याला म्हातारीच्या गोष्टीत तरी स्थान मिळतं. दुधीभोपळा कायमच दुर्लक्षित. खरंतर हा मुलगा स्वतःची वेगळी गुणवत्ता असलेला. मधुमेह वगैरे त्रासावर गुणकारी. तरीही त्याची स्वतःची काही ओळखच नाही. कधीही, कुठल्याही वेळी आणि अगदी कमी किंमतीत उपलब्ध असतो. मेथी, पालकापासून कांद्याचीही ओरडून ओरडून जाहिरात केली जाते, पण दुधीभोपळ्याचं नाव मास्तरसुद्धा कधीच ओरडून घेत नाहीत. तो वर्गात असणारच आणि त्याची जाहिरात केली, तरी ज्याला घ्यायचंय, तोच घेणार, बाकीचे ढुंकून पाहणार नाहीत, हाही अनुभव. तर, अशा या हुशार पण दुर्लक्षित दुधीभोपळ्याची आठवण होते, ती फक्त दुधीहलवा करताना किंवा कोफ्ता करी करताना. `न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार` असं तो सुदर्शनधारी सांगून गेलाय. आपण `कोफ्ता करी` करण्यासाठी चार युक्तीच्या गोष्टी ऐकूया.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


 • कोफ्त्यासाठी :
 • अर्धा किलो कोवळा दुधीभोपळा
 • 1 वाटी डाळीचे पीठ
 • एक चमचा गरम मसाला
 • एक चमचा जिरे पूड
 • चवीनुसार मीठ व लाल मिरचीचे तिखट
 • पाव चमचा हळद
 • करीसाठी :
 • डावभर तेल
 • एक चमचा जिरे
 • अर्धा किलो कांदे- बारीक चिरून
 • 2 चमचे आले-लसूण पेस्ट
 • चार टोमॅटो- उकडून, सोलून
 • चवीनुसार मीठ व तिखट
 • दोन चमचे गरम मसाला
 • पाव चमचा हळद
 • एक चमचा गरम मसाला

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


 • कोफ्ते
  प्रथम दुधी भोपळ्याची सालं काढून किसून घ्यावा. हाताने पिळून सर्व पाणी काढून टाकावे.
  एका परातीत दुधी भोपळ्याचा पाणी काढून टाकलेला कीस घेऊन त्यात किसाच्या निम्मे डाळीचे पीठ, जिरे पूड, मीठ, तिखट, 1 चमचा गरम मसाला घालून कालवावे.
  सारख्या आकाराचे छोटे गोल गोळे करून कढईत तेल तापवून मंद आचेवर गुलाबी रंगात तळून घ्यावेत
 • करी
  एका कढईत तेल गरम करावे व त्यात एक चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा घालावा.
  कांदा गुलाबी झाला की आले-लसणाची पेस्ट, गरम मसाला, तिखट, हळद घालावे. तेल सुटत आले की टोमॅटो घालावेत. चार वाट्या उकळते पाणी घालून मीठ घालावे.
  रस्सा उकळल्यावर ह्या ग्रेव्हीत तळून ठेवलेले कोफ्ते घालावेत व एक उकळी येऊ द्यावी. खाली उतरवून कोथिंबीर घालून सजवावे.
  गरम गरम कोफ्ते पोळी/फुलका किंवा भाताबरोबर सर्व्ह करावेत. `मी यापुढे कधीच दुधीभोपळ्याला नावं ठेवणार नाही,` अशी प्रतिज्ञा त्याआधी (किंवा नंतर) सर्व कुटुंबीयांकडून म्हणून घ्यावी.

[/one_third]

[/row]

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ५० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : जेवणातील भाजी

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:15 am

Web Title: how to make kofta curry maharashtrian recipes
Next Stories
1 कसं बनवायचं रगडा पॅटीस? | How to make Ragda Patties
2 कसे बनवायचे लाल भोपळ्याचे घारगे? | How to make Lal Bhopla Gharge
3 कसे बनवायचे दम आलू? | How to make Dum Aloo
Just Now!
X