X

कशा करायच्या कोहळ्याच्या वड्या? | How to make Kohalyachya Vadya

गोडाची आवड असणाऱ्यांसाठी एक वेगळा पदार्थ

अकबर बादशहाचा वेळ जात नसेल, तेव्हा तो देशोदेशींच्या विद्वानांना बोलावून घ्यायचा आणि डोक्याचा भुगा करणारे प्रश्न त्यांना विचारायला लावून, स्वतः तोशीस न लावून घेता, दरबारींना त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला लावून त्यांच्या डोक्याचा पिट्ट्या पाडायचा. असाच एक दिवशी कुठल्यातरी लांबच्या प्रदेशातून एक विद्वान आला होता. वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ विचारून त्यानं दरबारींचं डोकं उठवलं होतं. दरबारातले विद्वज्जन आपापल्या परीनं आणि वकुबाप्रमाणे त्या म्हणींचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न करून प्रश्नांना उत्तरं देत होते. बिरबल काही कारणाने त्या दिवशी दरबारात अजून पोहोचला नव्हता. बादशहानं त्याला पुन्हा राज्यातल्या मूर्खांची किंवा आंधळ्यांची यादी करायचं काम दिलं की काय, अशीच शंका प्रत्येकाच्या मनात आली होती. अचूक उत्तर देणाऱ्याला सुवर्णमुद्रा बक्षीस दिली जाईल, असं त्या विद्वानानं स्वतःच जाहीर केलं होतं. पण कितीही योग्य उत्तर दिलं, तरी त्यात काहीतरी खुसपट काढून, तेच शब्द बदलून तो योग्य उत्तर देत होता आणि कुणालाच बक्षीस मिळत नव्हतं. शेवटचा प्रश्न त्यानं विचारला, तो `आवळा देऊन कोहळा काढणं,` या म्हणीचा अर्थ. त्याच वेळी बिरबल दरबारात आला. त्यानं दिलेलं उत्तर विद्वानानं नाइलाजानं मान्य केलं, पण तरीही ते सुयोग्य नसल्याचं ऐकवलंच. फक्त तडजोड म्हणून तो बक्षीस द्यायला तयार झाला. विद्वानानं बक्षीस म्हणून बिरबलाच्या हातावर फक्त दोन नाणी टिकवली. बिरबल म्हणाला, “खाविंद, आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा खरा अर्थ मलाही माहीत नव्हता, तो आज कळला!“ सगळ्यांना धक्का बसला. विद्वानही जरासा चिडला. मग बिरबलानं त्याचं पितळ उघडं केलं. या म्हणींचा अर्थ त्या विद्वानालाही माहीत नाही, म्हणूनच तो आपल्याकडून सगळं काढून घेत होता. आता तो हीच कोडी दुसऱ्या राज्यात जाऊन अशाच एखाद्या दरबारातल्या लोकांना घालणार आणि त्याबदल्यात भरघोस बक्षीस मिळवणार. आपल्याला काय मिळालं? फक्त दोन नाणी! म्हणजे आवळा देऊन कोहळा काढल्यासारखंच नाही का? विद्वान हे ऐकून खजील झाला. अकबर-बिरबलाचं राहू द्या, पण आपण त्या निमित्तानं बघूया, याच कोहळ्याच्या वड्यांची रेसिपी.

साहित्य


 • अर्धा किलो कोहळ्याचा कीस
 • २ नारळ
 • ३ वाट्या साखर
 • १ वाटी पिठी साखर
 • एक चमचा तूप
 • १ वाटी साय किंवा खवा

पाककृती


 • कोहळ्याचा किस वाफवून घ्यावा.
 • नारळ खोवून मिक्सरमध्ये बारीक वाटावा.
 • एका जाड बुडाच्या भांड्याला तूपाचा हात फिरवावा.
 • त्यात नारळ, कीस, साधी साखर व साय / कुस्करलेला खवा घालावा.
 • गॅसवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे.
 • मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे  ढवळावे.
 • खाली उतरवून मिश्रण कोमट होईपर्यंत घोटावे.
 • तूपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून थापावे.
 • गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

First Published on: January 11, 2017 1:15 am
Outbrain