26 February 2021

News Flash

कसा बनवायचा चटपटीत मसाला पाव? | How to make Masala Pav

चटपटीत आणि चमचमीत मसाला पाव खाऊन तर बघा

Masala Pav : मसाला पाव

माणसाला जगायला काय लागतं? दोन वेळचं पोटभर जेवण, सकाळ-संध्याकाळचा सेमिजेवण स्वरूपातला नाश्ता, सकाळचा-नाश्त्यानंतरचा-संध्याकाळचा-उत्तर संध्याकाळचा चहा, पाऊस पडला किंवा मैत्रीण भेटायला आली, तर कॉफी, अध्येमध्ये तोंडात टाकायला चकल्या-कडबोळी-बाकरवडी-वेफर्स किंवा असेच काही चटपटीत पदार्थ, या सगळ्या वेळा टाळून दिवसातल्या इतर एखाद्या वेळी सरबत, ताक, ज्यूस किंवा लस्सी. बास! एवढ्यात भागून जातं. खरंतर कुठल्याही खात्यापित्या माणसाला एवढं तरी नक्कीच उपलब्ध असतं. घरचं कुणी ना कुणी त्याच्या या हौशीमौजी भागवत असतं. किंवा घरी नसलं, तरी दारी उपलब्ध असतंच. आपली प्रवृत्तीच निगेटिव्ह असेल, तर मात्र कशातच आनंद मिळत नाही. काही लोक ही सगळी सुखं तोंडाशी लोळण घेत असताना उगाच जेवणानंतर आवडीची बडीशेप नाही म्हणून रडत बसतात. अशी निगेटिव्ह वृत्ती खरंच आयुष्याचा आनंद हिरावून घेणारी. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्यामागचा उद्देश एवढाच, की माणसानं थोडक्यात गोडी मानावी. जे आहे त्यात सुख मानावं, नसलेल्यासाठी रडत बसू नये. मुख्य म्हणजे, आहे त्यात भागवायला शिकावं. उदाहरणार्थ, सॅंडविच आवडत असलं, तरी ब्रेड भाजण्यासाठी टोस्टर नाही, ग्रिल करण्यासाठी मायक्रोवेव्ह नाही, असली कारणं देत बसू नयेत. अगदीच पावाचा एखादा चटपटीत पदार्थ खायची इच्छा झालीच, तर मसाला पाव करून खावा. कांदा, लसूण, टोमॅटो या तर जीवनातल्या मूलभूत गरजा आहेत, त्या घरी असायलाच हव्यात. बाहेरच्या सारखा मसालापाव घरी बनवता येत नाही, ही चक्क अंधश्रद्धा आहे. तसंच, पावाची आवड असेलच, तर त्यात मैद्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे फक्त पोट फुगतं, अशा अंधश्रद्धांवरही अजिबात विश्वास ठेवू नये! चला, मग करायचा आज मसाला पाव?

साहित्य


 • अमूल बटर अर्धी वाटी
 • दोन मध्यम कांदे बारीक चिरून
 • दोन मध्यम टोमॅटो बारीक चिरून
 • दोन टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
 • पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • दोन चमचे पाव भाजीचा मसाला
 • पावभाजीचे पाव
 • एक चमचा लाल मिरचीचे तिखट
 • एक चमचा लिंबाचा रस
 • चवीनुसार मीठ.

पाककृती


 • तव्यावर अमूल बटर घालून गरम करून घ्या व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परता.
 • मग त्यात आलं-लसणाची पेस्ट घालून दोन मिनिटे परतून घ्या.
 • नंतर पाव भाजीचा मसाला घालून पुन्हा दोन मिनिटे परता.
 • आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो व लाल मिरचीचे तिखट घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.
 • मग हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे घालून ते कुरकुरीत होईपर्यंत परता.
 • आता पावाच्या दोन्ही बाजूला (बाहेरून आणि आतून) बटर लावून दोन्ही बाजू भाजून घ्या.
 • नंतर आतील बाजूला आपण तयार केलेला मसाला सगळीकडे पसरून लावा.
 • मसाला लावलेला पाव तव्यावर ठेवून डावाने सारखा दाबत राहून हलका भाजून घ्या.
 • याच पद्धतीने सगळे पाव मसाल्याचे तयार करून घ्या. गरम मसाला पाव पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ३५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : नाश्ता

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:00 am

Web Title: how to make masala pav maharashtrian recipes
Next Stories
1 कसा बनवायचा व्हेज फ्राइड राइस? | How to make Veg Fried Rice
2 कसा बनवायचा विना खटपट, झटपट (इन्स्टंट) डोसा? | How to make Instant Dosa
3 कशी बनवायची सीताफळ रबडी? | How to make sitafal rabdi
Just Now!
X