19 November 2017

News Flash

कशा करायच्या मटार वड्या? | How to make Matar Vadya

गोडाचा हटके पदार्थ

पुणे | Updated: January 3, 2017 11:31 AM

Matar Vadya - मटार वड्या

वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या, वाळवणं, कुरडया-पापड्या वगैरे प्रकरणं म्हणजे आजी कंपनीची खासियत असते. आजी इकडची असो किंवा तिकडची, ती आजीच असते. घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी पुरवणं तिला बरोबर जमतं. कुणाला काय आवडतं आणि काय आवडत नाही, हेही तिच्या बरोबर लक्षात असतं. विशेषतः नातवंडं हे प्रकरण तिला जास्त जिव्हाळ्याचं असतं. शाळांना सुट्या कधी लागणार, याची नातवंडांपेक्षा तिला जास्त प्रतीक्षा असते, कारण सुट्या लागल्यावर नातवंडं तिला भेटायला येणार, याची तिला खात्री असते. मग त्यांच्यासाठी कुठल्या मोसमात काय करायचं, याची तिची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. या तयारीमध्ये मग तिला कुणाचाही अडथळा नको असतो. तिची रोजची कामं मग नेहमीपेक्षा जास्त पटापट आवरली जातात, काही कामं सुना किंवा हाताशी असलेल्या इतर मंडळींकडे सोपवली जातात. काहीवेळा गडीमाणसांवरचा बोजा वाढतो, किंबहुना, आजीनं एखादं जादाचं काम लावलं, की शहरातले पाहुणे येणार आहेत, याची कुणकुण त्यांना लागते. आजी एकदा नातवंडांच्या सरबराईच्या तयारीला लागली, की तिला कुणीही रोखू शकत नाही. मग आजोबांची रोजची चहा-नाश्त्याची वेळसुद्धा चुकते, ठरलेल्या दिवशीची ठरलेली भाजी पानात पडत नाही, कधीकधी तर जेवणाची वेळही चुकते. पण आजीला त्याचं काही नसतं. तिला नातवंडांसाठी दुधीभोपळ्याचा हलवा करायचा, की मटारच्या वड्या करायचा, याची चिंता असते. नेहमीच्या पदार्थांमध्ये काहीतरी बदल करून वेगळंच काहीतरी घडवणं हा तर आजीचा हातखंडा प्रयोग. इतर वेळी ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरचा केक नसेल, तर इतर कुठल्याही केकना हातही न लावणाऱ्या नातवंडांना आजीनं केलेल्या मटारच्याच काय, कारल्याच्या वड्यासुद्धा गोड लागतात. कारण आजीनं त्या पदार्थात इतर घटकांबरोबरच प्रेमही ओतलेलं असतं. आपापल्या आजीची आठवण काढत आज बघूया, मटारच्या वड्यांची रेसिपी.

साहित्य


  • २ वाट्या मटार
  • ३ वाट्या साखर
  • १ वाटी दूध
  • वेलची पूड (आवडीनुसार)

पाककृती


  • मटार सोलून, मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.
  • मटार, साखर, दूध एकत्र करून रुंद भांड्यात गॅसवर शिजत ठेवावे.
  • शिजतानाच त्यात वेलची पूड घालावी.
  • मिश्रण सुकत आल्यावर (कडेला सुकल्याच्या खुणा दिसायला लागल्यावर) ताटात ओतून थापून वड्या पाडाव्यात.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ५० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : गोड पदार्थ

किती व्यक्तींसाठी : ४ ते ५ व्यक्तींंसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 3, 2017 1:15 am

Web Title: how to make matar vadya maharashtrian recipes