X

कसे करायचे मेथी शंकरपाळे? | How to make Methi Shankarpali

नेहमीच्या चवीपेक्षा जरा हटके, खमंग कुरकुरीत पदार्थ

स्वयंपाक करणं ही कला असेल, तर आहे त्याच साहित्यात वेगळ्या चवीचे, पण तेवढच रुचकर पदार्थ करणं ही जास्त मोठी कला आहे. खरंतर ही मूळ पदार्थाची नक्कलच. पण जरा वेगळी. नकला करायला मूळ कलेपेक्षा जास्त मेहनत, बुद्धी आणि कौशल्य आवश्यक असतं. मूळ कला सादर करताना ती आपल्या पद्धतीनं, आपल्या सोयीनं, आपल्या शैलीत करता येते. नकला करताना मात्र तीच पद्धत, तीच शैली हुबेहूब सादर करायची असते. मूळ ढाचा तोच ठेवून त्यात विनोद आणि मार्मिकता, हजरजबाबीपणाचा मसाला गुंफायचा असतो. त्यातूनही दर्जा टिकवून मूळ व्यक्तीचा आभास सादर करायचा असतो. `काय रोज रोज तेच तेच!` हे म्हणणं अगदी सोपं असतं, पण रोज नवीन प्रकार, नवीन पदार्थ शोधून काढणं हे महाकठीण! `आज भाजी काय करू?` या प्रश्नाला महिलांची राष्ट्रीय समस्या मानलं गेलं आहे, ते काही उगाच नाही! अशा वेळी खणात धूळ खात पडलेली जुनी पुस्तकं, फारशा संपर्कात नसलेल्या मैत्रिणी, आत्या, मावश्या, काक्या, आत्ते-मावस-चुलत बहिणी, वहिन्या, नणंदा, जावा, आज्या, पणज्या कामाला येतात. चुकून कुणाचीतरी भेट होते आणि त्या बोलता बोलता एखादा वेगळा पदार्थ सांगून जातात. भारतीय पाककला बहरण्यामागे आणि समृद्ध होण्यामागे स्वयंपाकाची आवड आणि कला, यापेक्षाही रक्ताची आणि बिनरक्ताची नातीही तेवढीच कारणीभूत आहेत. वेगळा पदार्थ जमला, की आपण अर्धा डाव जिंकल्यासारखं असतं. उरलेला अर्धा डाव घरच्यांना तो पदार्थ आवडल्यानंतरच जिंकता येऊ शकतो. पण एखाद्या कसलेल्या गृहिणीला हे लक्ष्यही फार कठीण नसतं. तर, आज प्रयोगासाठी हा एक वेगळा पदार्थ.

साहित्य


 • ३/४ वाटी गव्हाचे पीठ
 • १/४ वाटी मैदा
 • १ टी स्पून तेल
 • २ टी स्पून कसूरी मेथी
 • २ चिमूट ओवा
 • चवीपुरते मीठ
 • तळण्यासाठी तेल

पाककृती


 • मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात १ टी स्पून गरम तेलाचे कडकडीत मोहन घालावे.
 • ओवा, कसूरी मेथी (हाताने चुरडून पावडर बनवावी) पिठात घालावी. पाण्याने घट्ट भिजवून १५ मिनिटे झाकून ठेवावे.
 • १५ मिनिटांनी मळलेल्या पीठाचे २ समान भाग करावे. १ पिठाचा गोळा एकदम पातळ लाटावा आणि सुकू नये म्हणून त्यावर झाकण ठेवून झाकावा. नंतर दसर्‍या पिठाची पोळी लाटावी. त्याच्या वरील बाजूस तेल लावावे आणि झाकलेली पोळी त्यावर ठेवावी. दोन्ही पोळ्या एकमेकांना चिकटण्यासाठी थोडे दाबून एकदा लाटून घ्यावे.
 • कातणाने शंकरपाळ्यांच्या आकारात कापून तेलात मध्यम आचेवर कडक होईपर्यंत तळून घ्यावेत.

First Published on: January 9, 2017 1:15 am
Outbrain