19 November 2017

News Flash

कसा करायचा नाचणीचा उपमा? | How to make Nachni Upma

पौष्टिक आणि चविष्ट, नाश्त्यासाठीचा वेगळा पदार्थ

पुणे | Updated: January 18, 2017 1:15 AM

Nachni Upma : नाचणी उपमा

`मंगल देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा` असं आपल्या लाडक्या महाराष्ट्राचं वर्णन असलं, तरी `पोहे आणि उपम्याच्या देशा` अशी उपमा या राज्याला दिली ती ती चुकीची ठरू नये. इंग्रज येण्यापूर्वी या भूमीत सोन्याचा धूर निघायचा, असं म्हणतात. मोदींनी गॅस सबसिडी जाहीर करेपर्यंत चुलीचा धूर निघत होता. पोहे आणि आणि उपम्यांची वाफ मात्र कित्येक वर्षं अबाधित आहे. पोहे किंवा उपमा आठवड्यातून दोनदा तरी खाल्ला नाही, त्याला मराठी माणूस म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. पोह्याला महाराष्ट्रात जवळपास देवाएवढंच महत्त्व आहे. त्याचा भाऊ म्हणजे उपमा. अचानक कुणीही पाहुणे घरी आल्यानंतर करण्याचा पोहे हा राजमान्य पदार्थ आहे, तसाच `आज काहीतरी वेगळं कर` म्हटल्यानंतर करण्याचा दुसरा गृहिणीमान्य पदार्थ म्हणजे उपमा. त्याच रव्यापासून बनणारा शिरासुद्धा तेवढाच सोयीचा असला, तरी त्यात तूप किती घालायचं, गूळ घालायचा की साखर, बदाम घालायचे की शेंगदाणे, याच्यावरून वाद होऊ शकतो. त्यातून `कधी नव्हे ते घरी गेलो होतो आणि दिलं काय, तर तूप नसलेला, बदामाचा वास दिलेला शिरा!` हे ऐकून घ्यायला लागण्यापेक्षा `उपमा खाऊन पोट भरलं,` हे कौतुक ऐकायला मिळणं जास्त सोयीचं असतं. बरं उपम्याला दरवेळी वेगळ्या पद्धतीचा आभासही देता येतो. शेंगदाणे घाला, मटार घाला, किंवा कांदा घाला, प्रत्येकाची चव वैशिष्ट्यपूर्णच असते. रव्याबरोबरच नाचणीचा उपमा हा एक वेगळा प्रकारही भन्नाट लागतो. पौष्टिक आणि पचायला हलका म्हणूनही नाचणीच्या उपम्याला जास्त पसंती मिळते. तेव्हा आज शिकूया नाचणीच्या उपम्याची पाककृती.

साहित्य


 • १ वाटी नाचणी
 • १ टी.स्पून मेथी
 • १ टे.स्पून मोडाचे मूग
 • १ टे.स्पून गाजर-टोमॅटो प्रत्येकी
 • २ बारीक चिरुन मिरच्या
 • हिंग
 • मोहरी
 • आलं-लसूण पेस्ट
 • तेल
 • जीरे
 • हळद
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • लिंबूरस

पाककृती


 • नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे.
 • थोड्या तेलात मोहरी, जिरे घालून फोडणी करावी.
 • यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालवी.
 • गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनिटे शिजवावे.
 • २-३ वाफा आल्या की नाचणी घालावी.
 • मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनिटे गॅसवर ठेवावे.
 • कोथिंबीर व शेव घालून सर्व्ह करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ३५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : नाश्ता

किती व्यक्तींसाठी : २ ते ३ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 18, 2017 1:15 am

Web Title: how to make nachni upma ragi upma maharashtrian recipes