News Flash

कशा करायच्या पाटवड्या? | How to make Patwadi

डाळीच्या पिठाचा खमंग, चटपटीत पदार्थ

Patwadi : पाटवडी

““ह्यॅ! काय हे? आजसुद्धा डाळीचं पिठलं?“ तो करवादला. “कुळथाचं करायला हवं होतं का मग?“ तीसुद्धा आज मागे हटण्याच्या मूडमध्ये नव्हती. रोज काय पिठल्यावरून ऐकून घ्यायचं? “विनोद करून नकोस, मला खरंच राग आलाय!“ तो आज स्मायलींनी ऐकणारा नव्हता. आणि मग एकच भांडण जुंपलं. त्यानं तिच्या लग्नापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या पाककलेच्या उद्धार केला. तिनंही निमित्त साधून, कुठल्याही पदार्थाचं मनापासून कौतुक न करण्याच्या त्याच्या कलेचा आणि हातासरशी त्याच्या जन्मदात्यांच्या या (आणि यासंबंधींच्या) सवयींवरून उद्धार केला. हे भांडण एवढं टोकाला गेलं, की शेवटी दोघांनीही जेवणार नसल्याचं जाहीर केलं. ती बेडरूममध्ये जाऊन बसली आणि तिनं दार आतून लावून घेतलं. तो हॉलमध्येच बसला. बेडरूमचं दार आधीच लावलेलं असल्यामुळे, त्याला आणखी कुठलं दार लावून घेण्याची गरज पडली नाही. थोड्या वेळानं बाहेरच्या दाराची बेल वाजली. ती धावत बाहेर आली. तिनं मागवलेला पिझ्झा आला होता. ती त्याच्यासमोरच तो खात बसली. त्याची चिडचीड झाली, पण तो गप्प राहिला. एटीएमच्या रांगेत उभं राहिल्यानंतर तो गिळतो, तसाच आजही त्यानं राग गिळून टाकला. आणखी थोड्या वेळानं त्यानं मागवलेली चिकन बिर्याणी आली. त्यानंही तिच्यासमोरच बसून ती खाल्ली. खाताना तिला आवडत नाही, तो मचमच आवाज मुद्दाम केला. दुसरा दिवस उजाडला. दिवस नेहमीप्रमाणेच ऑफिसच्या कामाच्या धबगडग्यात गेला. रात्री घरी आल्यावरसुद्धा बेसनाचा वास आला आणि त्याचं टाळकं सटकलं. आज संयम वगैरे गेला ****त. आज इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण ऐकून घ्यायचं नाही, असं त्यानं ठरवलंच होतं, तेवढ्यात ती एका डिशमध्ये छान सजवलेल्या त्याच्या आवडीच्या पाटवड्या बाहेर घेऊन आली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हात वगैरे धुवायचंही भान त्याला राहिलं नाही. त्यानं तशाच चार-पाच वड्या तोंडात टाकल्या आणि मिटक्या मारत खाल्ल्या. “तुला आवडतात, म्हणूनच केल्यायंत मुद्दाम. आणि हो, थोडं बेसन उरलं, त्याचं पिठलंच करून टाकलं. मग, काय मागवायचं आज जेवायला? पिझ्झा, की चिकन बिर्याणी?“ तिनं डोळे मिचकावून विचारलं आणि तो चोरटं हसला. तिनं त्याला कोपरखळी मारली आणि दोघंही खदखदून हसायला लागले.

साहित्य


 • १ वाटी बेसन
 • सव्वा वाटी पाणी
 • पाव वाटी सुके किसलेले खोबरे
 • ३-४ पाकळ्या लसूण ठेचून
 • पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
 • चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ
 • २ टेबलस्पून तेल
 • फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हळद. आवडत असेल तर कढीपत्ता

पाककृती


 • बेसन नीट चाळून गाठी काढून घ्याव्यात.
 • एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल मध्यम आचेवर तापत ठेवावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता,  हळद घालून खमंग फोडणी करावी.
 • ठेचलेला लसूण व थोडे खोबरे त्यात घालून साधारण २-३ मिनिटे परतावे.
 • परतल्यावर सव्वा वाटी पाणी घालून व्यवस्थित उकळी आणावी.
 • पाणी उकळत आले की लाल तिखट, मीठ थोडी कोथिंबीर घालावी.
 • गॅस बारीक करून त्यात बेसन हळुहळू घालावे.
 • भराभर हलवावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
 • साधारण घट्ट पिठल्यासारखे झाले पाहिजे. पातळ वाटल्यास त्यात आणखी थोडे बेसन घालावे.
 • मंद गॅसवर एक वाफ आणावी. दणदणून वाफ आली की कडेने २ टेबलस्पून तेल सोडवे. पिठाचा गोळा नीट मिसळून घ्यावा.
 • एका ताटाला थोडे तेल लावून त्यावर पिठले घालून नीट पसरावे.
 • नीट पसरले की त्यावर खोबरे, कोथिंबीर नीट दाबून पसरावे.
 • गरम असतांनाच वड्या पाडाव्यात. गार झाल्यावर काढाव्यात. (आणि पुन्हा कुठल्या नव्या विषयावरून डोकं गरम व्हायच्या आधी खाव्यात!)

पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ४० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:15 am

Web Title: how to make patwadi maharashtrian recipe
Next Stories
1 कशी करायची मोड आलेल्या कडधान्यांची भेळ? | How to make Sprouts Bhel
2 कसा करायचा स्वीट कॉर्न उपमा? | How to make Sweet Corn Upma
3 कसा करायचा हळदीतला बांगडा मसाला? | How to make turmeric Bangda Masala
Just Now!
X