[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेजारी राहायला पाटलांची मांजर एक नंबरची चोरटी होती. देशपांडे काकू तिच्यावर आठ दिवसांतच वैतागल्या होत्या. खरंतर सोसायटीला मांजरांची सवय नव्हती, असं नाही. पण आधीच्या मांजरी सोसायटीतल्या सदस्यांच्या स्वभावाप्रमाणेच नाकासमोर चालणाऱ्या आणि शांत स्वभावाच्या होत्या. कुणाच्याही घराच्या दाराशी उभं राहून `म्यांव` केलं, तरी दूधदुभतं भरपूर मिळत होतं. अध्येमध्ये आईस्क्रीम, वडापावचा नैवेद्यही ठरलेलाच. बाकी सणासुदीला उंदीर, घूस, कबूतर वगैरे जे काही त्या त्या दिवसाच्या मूडनुसार आणि उपलबद्ध संधीनुसार मटकवायचं, ते साहित्यही मुबलक उपलब्ध होतं. त्यामुळे कधी एकवेळ कित्येक (प्राणी, पक्षी) हत्या केल्या, तरी चोरी करण्याचं पातक त्या सोसायटीतल्या मांजरांच्या माथी कधी लागलं नव्हतं. पलीकडच्या फ्लॅटमध्ये पाटील कुटुंब राहायला आलं आणि त्यांच्या बरोबर आलेल्या मांजरानं सोसायटीची सगळी शिस्त बिघडवली. कधीही कुणाच्याही घरात घुसून दूध, दह्यावर ताव मारायला ही मांजर सवकली होती. एखाद दिवशी तिची (आणि तिच्या मालकिणीची!) खोड जिरवायचीच, असं देशपांडे काकूंनी ठरवून टाकलं होतं. आणि अखेर तो सुदिन उजाडला. त्या दिवशी काकूंनी घरी सगळ्यांच्या आवडीची फिरनी म्हणजे तांदळाची गोड खीर केली होती. दोन्ही मुलांना ती जास्तच आवडायची, म्हणून संध्याकाळी सगळ्यांनी एकत्रच खायची, असं ठरलं होतं. संध्याकाळी स्वयंपाकघरात इतर तयारी करताना काकूंना जाणवलं, की फिरनीचं पातेलं निम्मं झालेलं आहे. हा पाटील काकूंच्या मांजराचाच अपराध असणार, असं ठरवून देशपांडे काकूंनी आज भांडणच काढलं. सुदैवानं पाटील काकूंनी नमतं घेतलं, माफी मागितली, त्यामुळे `मी खीर खाल्ली तर बुड घागरी`चा प्रयोग त्या मांजरावर करावा लागला नाही. सगळे रात्री एकत्र जेवायला बसले आणि आजीने आजोबांना सवयीप्रमाणे विचारलं, `तुम्हाला हवी तर थोडी वाढते. पण आवडेल ना तुम्हाला?` आजोबा पटकन बोलून गेले, `हो, वाढ की. छान झालेय खीर!` आणि त्याच क्षणी घागरीवर नक्की कुणाला उभं करायचं, हा प्रश्न मिटून गेला.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make phirni rice khir maharashtrian recipes
First published on: 19-01-2017 at 01:15 IST