News Flash

कसे बनवायचे पायनॅपल रायता? | How to make Pineapple Raita

जेवणातला सगळ्यांना आवडणारा, गोडाचा पदार्थ

Pineapple Raita : पायनापल रायते

[content_full]

अकबर बादशहाच्या बेगम साहेब काही दिवस नाराज दिसत होत्या. एकटा बिरबलच असा होता, ज्याच्याशी त्या मोकळेपणानं बोलायच्या. तोसुद्धा कधी बादशहाच्या समोरही त्यांची थट्टामस्करी करू शकत होता. गेले काही दिवस मात्र बेगम साहेब अजिबात थट्टेच्या मूडमध्ये दिसत नव्हत्या. कुठलीतरी चिंता त्यांना सतावत होती किंवा काहीतरी बिनसलं होतं, हे नक्की. बिरबलानंच शेवटी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. बेगम साहेब सुरुवातीला काही सांगायला तयार होईनात, पण बिरबलावर विश्वास असल्यामुळे शेवटी त्यांना मन मोकळं करावंसं वाटलंच. `बादशहांना माझ्या हातचं काहीच गोड लागेनासं झालंय हल्ली. मी नावडती झालेय त्यांच्यासाठी!` बेगमनं सांगितलं. बिरबलाला आश्चर्य वाटलं. बेगम साहेबांनी मग बादशहांसाठी त्या दिवशी प्रेमानं अनननसाचं शिकरण केलं, तेही फक्त नाव ऐकून बादशहा भरल्या ताटावरून कसे उठून गेले, तो किस्सा सांगितला. बिरबलाला वाईट वाटलं. बादशहांनी असं करायला नको होतं, हे त्यानंही कबूल करून टाकलं. हल्ली त्यांच्यासाठी कुठलाही पदार्थ हौसेनं केला, तरी ते नाकं मुरडतात, असं सांगताना बेगम साहेबांचे डोळे भरून आले होते. बिरबलानं त्यांना धीर दिला. सर्व काही ठीक होईल, असं सांगून आपल्यावर विश्वास ठेवायला सांगितलं आणि तो पुढच्या कामाला लागला. दुसऱ्या दिवशी त्यानं दरबारात एका जोडप्याला हजर केलं. त्यातला नवरा बायकोला स्वयंपाक येत नाही, म्हणून घटस्फोट द्यायला निघाला होता. बायको रोज घरीच असते, तरी कुठलेच वेगळे, आकर्षक पदार्थ करत नाही, अशी त्याची तक्रार होती. `परवाच तिनं माझ्यासाठी गोड म्हणून अननसाचं शिकरण` केलं होतं,` असं सांगून तो म्हणाला, “हा पदार्थ मीसुद्धा करू शकेन. त्यासाठी बायकोनं एवढं खपायची काय गरज आहे?“ बादशहानं तातडीनं त्याचा मुद्दा उचलून धरला. त्याला घटस्फोटाची परवानगी देणार, एवढ्यात बिरबलानं मध्यस्थी केली. तो म्हणाला, “खाविंद, हा नवरा चॅलेंज स्वीकारायला तयारच आहे, तर आधी त्यानं ते पूर्ण करून दाखवावं, मग आपण निवाडा करावा, असं मला वाटतं.“ बादशहाला बेगमबरोबरच बिरबलाचीही जिरवायची संधी मिळाली होती. त्यानं मान्य केली आणि लगेच समोर अननसाच्या शिकरणाचं प्रात्यक्षिक सादर करण्याची सगळी तयारी झाली. नवऱ्यानं उत्साहानं आणि अतिआत्मविश्वासानं तो पदार्थ करायला घेतला, पण एवढी मेहनत घेऊनही काहीतरी बिघडलंच. मग बायकोनं तोच पदार्थ त्याला तेवढ्याच वेळात करून दाखवला आणि सगळ्यांनी बोटं चाटत तो खाल्ला. बादशहानं त्या नवऱ्याला बायकोशी चांगलं वागायची तंबी देऊन घरी पाठवून दिलं. त्या रात्री बेगमनं केलेलं अननसाचं शिकरण बादशहानं स्वतः बोटं चाटत खाल्लं, वर तिची तारीफही केली. आजपासून या पदार्थाला `पायनॅपल रायता` म्हटलं जाईल, अशी घोषणाही करून टाकली. टीप : सोशल मीडियावर अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या नावाने फिरणाऱ्या पोस्टसप्रमाणेच, या पोस्टचाही अकबर-बिरबलाशी काही संबंध आढळल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


 • ३/४ कप अननस लहान फोडी
 • १ कप घट्ट मलईचे दही
 • चवीपुरते मीठ
 • चवीनुसार साखर
 • सजावटीसाठी
 • चेरी आणि ४ ते ५ अननसाचे लहान तुकडे

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


 • अननसाच्या फोडी साखरेच्या पाण्यात कुकरमध्ये अर्धवट शिजवून घ्याव्यात.
 • दही चांगले फेटून घ्या. त्यात साखर आणि थोडे मीठ घालावे.
 • फेटलेल्या दह्यात अननसाच्या फोडी गार झाल्यावर घालाव्यात. चव पाहून साखर मीठ आवडीनुसार वाढवावे. चांगले एकत्र करावे.
 • बाऊलमध्ये घालून अननसाच्या फोडी आणि चेरीने सजवावे. थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.
 • किंचित मिरपूड घातल्याने छान स्वाद येतो. फक्त ती आधीच दह्यात मिसळू नये. खायच्या वेळी वरून भुरभुरावी.

[/one_third]

[/row]

पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे

एकूण वेळ : २५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : गोड पदार्थ

किती व्यक्तींसाठी : २ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:15 am

Web Title: how to make pineapple raita
Next Stories
1 कशी बनवायची कुरडयांची भाजी? | How to make Kurdaichi Bhaji
2 कसा बनवायचा मूग पकोडा? | How to make Moong Dal Pakoda
3 कशी बनवायची व्हेज फ्रॅंकी? | How to make Veg Frankie
Just Now!
X