19 November 2017

News Flash

कशी करायची उपासाची कोफ्ता करी? | How to make Upwas Kofta Curry

उपासाचा एक वेगळा, चविष्ट पदार्थ

पुणे | Updated: January 24, 2017 1:15 AM

Upwas Kofta Curry : उपासाची कोफ्ता करी

यावेळी उपासाला तेच तेच पदार्थ नकोत, असं सासूबाईंनी आधीच जाहीर केलं होतं. त्यांच्या निमित्तानं मग सासूबाईंचा लाडका मुलगा, त्याची मुलं यांनाही उपासाला काहीतरी वेगळं, चमचमीत खावं, असं वाटायला लागलं होतं. मुळात उपासाच्या दिवशी खाण्याचा नाही, तर पोटाला आराम देण्याचा विचार आधी करायचा असतो, हे त्यांच्या गावीच नव्हतं बहुधा. दीपानं त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या फायद्याच्या नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत सगळी सासरची मंडळी जे करतात, तेच त्यांनी केलं – दुर्लक्ष! एकूण काय, तर पुढच्या उपासाला घरात कुठला पदार्थ शिजणार, याच्यावर महिनाभर आधीपासूनच चर्चा सुरू झाल्या होत्या. साबूदाण्याची खिचडी, रताळ्याचा कीस, बटाट्याची खीर वगैरे गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. रताळ्याची खिचडी, साबूदाण्याची खीर आणि बटाट्याची खिचडी, असे उपाय दीपानं सुचवून बघितले, पण त्यात फक्त शब्दांचा खेळ आहे, हे सासरच्या चाणाक्ष मंडळींनी लगेच ओळखलं. अंगारकी नक्की कुठल्या वारी येते, इथपासून सामान्यज्ञानाची बोंब असली, तरी उपासाला काहीतरी वेगळं खायचं, यावरचा ठाम निर्णय काही बदलत नव्हता. काय खायचं हे नक्की होत नव्हतं, पण काय खायचं नाही, याचा निर्णय झाला होता. `तुम्ही उपासाचा पिझ्झा का नाही मागवत बाहेरून?` असा एक अत्यंत आकर्षक वाटणारा पर्याय तिनं सुचवून बघितला, पण त्यातला टवाळीचा सूर सासरच्यांना यावेळी लगेच ओळखता आला. अखेर काहीतरी वेगळा उपासाचा पदार्थ करणं तिच्या नशीबी आलंच. उपासाचा दिवस उजाडला आणि तिनं खूप विचार करून, अभ्यास करून, मेहनत घेऊन उपासाची कोफ्ता करी तयार केली. सगळ्यांना ती अतिशय आवडली. त्यात आपल्याला खूप दमायला झाल्याचं जाहीर करून तिनं संध्याकाळी उपास सोडायला हॉटेलात जायचं, हे जाहीर करून टाकलं आणि त्याचवेळी पुन्हा उपासाला कुठल्या वेगळ्या पदार्थाचा हट्ट धरायचा नाही, हे तिच्या सासूबाईंच्या लाडक्या सुपुत्रानंही मनाशी पक्कं करून टाकलं!

साहित्य


 • कोफ्त्यासाठी
 • किसलेलं कच्च केळं – १
 • उकडलेला बटाटा – १
 • कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची पेस्ट – १ चमचा (पाणी न घालता वाटणे)
 • जिऱ्याची पूड अर्धा चमचा
 • राजगिरा / साबुदाणा पीठ – प्रत्येकी १ मोठा चमचा किंवा उपासाची भाजणी २ मोठे चमचे
 • चवीनुसार मीठ
 • ताक किंवा पाणी – गरजेप्रमाणे पीठ मळण्यासाठी
 • तळण्यासाठी तेल किंवा तूप
 • ग्रेव्हीसाठी
 • दाण्याचं कूट – २ मोठे चमचे
 • ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची पेस्ट – १/२ छोटी वाटी (मऊसर वाटून घेणे)
 • तूप, जिरे  – फोडणी साठी
 • चवीनुसार मीठ / साखर

पाककृती


 • प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कोफ्त्यासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. गरजेप्रमाणे ताक किंवा पाणी घालून गोळा मळावा. शक्यतो ताक / पाणी लागत नाही, कारण केळ्याचा ओलसरपणा पुरतो.
 • तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून मंद आचेवर तेलात किंवा तुपात तळावेत. कमी तेलकट / तुपकट करण्यासाठी सानिका नि सांगितल्याप्रमाणे आप्पे पात्राचा वापर करावा
 • आता ग्रेव्ही साठी एका कढईत तूप – जिऱ्याची फोडणी करावी
 • त्यात तयार केलेली पेस्ट (नंबर २ मधे दिलेली) टाकून जरा वेळ परतावे
 • मग दाण्याचं कूट टाकून पाणी घालावे. ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे, त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे
 • चवीनुसार मीठ / साखर घालून मंद आचेवर एक ५ मिनिटे ग्रेव्ही उकळू द्यावी आणि गॅस बंद करावा.
 • बाउलमध्ये तयार कोफ्ते ठेवून वरून ग्रेव्ही घालावी

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

एकूण वेळ : ४५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : उपवासाचा पदार्थ

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 24, 2017 1:15 am

Web Title: how to make upwas kofta curry maharashtrian recipes