News Flash

कसे करायचे व्हेज मोमो? | How to make Veg Momos

मोदकासारखाच, पण तिखट, चविष्ट पदार्थ

Veg Momos : व्हेज मोमो

[content_full]

“उद्यापासून बाहेरचं खाणं बंद! पिणं बंद! तेल-तूप जास्त खायचं नाही. बेकरी प्रॉडक्टस अजिबात खायचे नाहीत. कोल्ड्रिंक्स घ्यायची नाहीत. वेळीअवेळी खायचं नाही, रात्री ८ नंतर जेवायचं नाही, सकाळी लिंबू-मध घालून गरम पाणी प्यायचं, एकावेळी भरपूर जेवायचं नाही…“ प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. खादाडे सुशीलाताईंना सांगत होते. एवढं सगळं ऐकून सुशीलाबाईंनाच धाप लागली होती. डॉ. खादाडे एकदाचे थांबले, तेव्हा कुठे सुशीलाबाईंना बोलण्यासाठी बऱ्याच वेळानंतर तोंड उघडता आलं. शक्यतो अशी वेळ त्यांच्यावर कधी येत नसे. आजही आली नसती, पण आज त्यांचाही नाइलाजच झाला होता. एवढे दिवस त्या सगळ्यांची बोलणी खात होत्या. नाही म्हणायला गेलं, तरी त्यांचं वजन चांगलंच वाढलं होतं. बरेच प्रयत्न करूनही ते कमी होत नव्हतं. आठवतील त्या सगळ्या देवांना नवस बोलून झाले होते, आसपासच्या सगळ्या बाबा-महाराजांच्या पाया पडून झालं होतं. वजन कमी करण्याविषयी खूप वाचलं, खूप बोललं की आपलं वजन कमी होईल, याबद्दल त्यांना ठाम विश्वास होता. मात्र अनेक दिवस होऊनही त्यातून काहीच घडेना, तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या. शेवटी कुणीतरी डॉ. खादाडेंचं नाव सुचवलं आणि सुशीलाताई त्यांच्या दवाखान्यात येऊ धडकल्या होत्या. ते एवढे भरपूर सल्ले देतील आणि बंधनं घातली, याची सुशीलाताईंना सुतराम कल्पना नव्हती. मात्र, आता त्यांचं ऐकणं भाग होतं. शिवाय, `एक बार जो मैने कमिटमेंट कर दी,`हेसुद्धा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. आल्या आल्या त्यांनी घरात ही घोषणा केली आणि उद्यापासून घरातल्या सगळ्यांनाही हेच डाएट करावं लागेल, असंही जाहीर केलं. एकही दिवस हे व्रत मोडायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या दिवशी जेवणात सगळ्यांनी व्हेज मोमो चाटूनपुसून खाल्ले. डाएट सुरू करण्याबद्दल सुशीलाताईंची कमिटमेंट कायम होती. पण रोज पेपरमध्ये आलेला एखादा नवीन पदार्थ एकदातरी करून बघणं, हीसुद्धा त्या कमिटमेंटच मानत असत. आणि एक बार कमिटमेंट कर दी, तो…

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


 • पारीसाठी
 • २ वाट्या मैदा
 • अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
 • १/२ टी स्पून मीठ
 • २ टी स्पून तेल
 • सारण
 • १  टी स्पून तेल
 • अर्धी वाटी कोबी पातळ चिरून, अर्धी वाटी गाजर किसून, 1 मोठा कांदा बारीक चिरून, १ भोपळी मिरची उभे पातळ काप करून, ६- ७ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची – एकदम बारीक चिरून घ्यावे.
 • १/४ टी स्पून मिरपूड
 • १ टी स्पून सोया सॉस
 • चवीपुरते मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


 • मैद्यामध्ये तेल, मीठ व बेकिंग पावडर घालून पीठ भिजवून ठेवावे.
 • कढईत तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, आले आणि मिरची परतून घ्यावी.
 • नंतर त्यात सर्व भाज्या घालून परतावे.
 • त्यात मीठ घालून परतून एका भांड्यात काढावे.
 • मिरपूड आणि सोया सॉस घालून मिसळून सारण गार करायला ठेवावे.
 • भिजवलेल्या मैद्याचे पुरीप्रमाणे छोटे गोळे करून त्याची पातळ पुरी लाटून घ्यावी.
 • पुरीत सारण भरून छोट्या-छोट्या चुण्या करून पाण्याचा हात लावून पुरीचे तोंड बंद करावे. असे सर्व मोमोज करावेत.
 • कूकरमध्ये / इडली पात्रात सर्व मोमोज मोदकाप्रमाणे उकडावेत.
 • गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
 • टीप
 • मोमोज उकडण्याऐवजी तळून सुद्धा चांगले लागतात.

[/one_third]

[/row]

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ४० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ६० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:15 am

Web Title: how to make veg momos
Next Stories
1 कसा करायचा बेबी कॉर्न पकोडा? | How to make Baby Corn Pakoda
2 कसा करायचा अंड्याचा पराठा? | How to make Egg Paratha
3 कशी करायची खिमा भजी? | How to make Keema Bhaji
Just Now!
X