|| डॉ. संजीव व्यंकटेश म्हात्रे

पाहुण्याचं पोट तुडुंब भरलं तरी आणखी खाण्याचा आग्रह करतंच राहणं हे आगरी समाजाचं वैशिष्टय़. घरातील अन्नधान्याचा साठा तळाशी गेला असेल, तरीही पाहुणचारात काहीच कमतरता राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. आलेल्या पाहुण्यासाठी वडे-शागोती बेत ठरलेलाच असतो. आगरी घरात एकदा गेलेला पाहुणा तिथलं आदरातिथ्य आयुष्यभर विसरत नाही.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Carrer Modeling area Brand building Digital Marketing
चौकट मोडताना: दुरावलेली नाती
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा
Shigeichi Negishi
व्यक्तिवेध: शिगेइची नेगिशि

जांभुळीच्या झाडावर

काक करी टर टर

लावी जिवालाही घोर

कोण येणार येणार

नाही चित्त थाऱ्यावर

मनी वाटे हूरहूर

जरी दूर गं माहेर

आला बंधू पाहुणा बाहेर

‘नाय नाय नाय, ज्यवले बिगर नय जावाचा. दादूस काय बोलंल, बायनी उपाशी धारलं.’ आगरी कुटुंबांत हा आग्रह नेहमीचाच. आलेल्या पाहुण्याच्या हाताला धरून दाराच्या कोलवावरून खेचत पुन्हा घरात आणून जेवायला बसवलं जातं. ‘आग्रह’ हा शब्दही तोकडा पडावा अशी ही इथली रीत. घरी आलेला अतिथी हा ओळखीचा असो वा नसो, तो आपल्या माहेरचाच आहे, असं मानून त्याचं आदरातिथ्य करणं ही वृत्ती आगरी स्त्रियांमध्ये हमखास पाहायला मिळतं. आगरी समाजातील कोणाच्याही घरी एकदा जाऊन आलेला पाहुणा, त्याने अनुभवलेला पाहुणचार, त्यात लपलेलं निस्वार्थ प्रेम आयुष्यभर विसरत नाही.

पूर्वापार चालत आलेली ही सवय आजच्या पिढीपर्यंत झिरपली आहे. पूर्वी केवळ शेतीभातीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या अन्नावर उपजीविका करणारा हा समाज, त्या काळातही सर्वाचं अदरातिथ्य मनापासून करत असे. ‘भादवा’ आला तरी अतिथीसेवेत कमी पडत नसे. भादवा म्हणजे भाद्रपद.

वरीसभं खपून पायलीभर मिलला,

सरवन खपस्तवर पोटानी गिलला.

रांजन भांडा रिता झाला,

घरन आथा भादवा आला.

श्रावणापर्यंत पुरेल एवढंसं अन्न. संपल्यावर कुटुंबाची विवंचना पुन्हा भाताचं पीक येईपर्यंत सुरू. तशात ‘भादव्यात’ भाद्रपदात गणरायाची स्वारी त्यांची परीक्षा पाहण्यास हजर. तरीही या त्यांच्या लाडक्या गणरायाचा व गौरुबायचा सण जे असेल त्यात समाधान मानून अतिशय उत्साहात, आनंदात साजरा करत. अशाही परिस्थितीत त्यांचा पाहुणचार कधीच कमी पडला नाही.

गावाच्या वेशीवर पाय ठेवताच, आलेल्या पाहुण्याला त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहचवण्याचं काम यथेच्छ बागडऱ्या चिल्यापिल्यांचं. त्यात पाहुणा जर का सुटाबुटातील असेल तर मग तो त्यांचा ‘सेलिब्रिटीच’. कधी कधी नवखा पाहुणा असेल तर थट्टामस्करीही सुरू होई. थट्टामस्करी व विनोदी शैलीसाठी आगरी समाज प्रसिद्ध आहेच. ते गुणधर्म बहुधा पारंपरिक असावेत. दारावर पाहुणा येताच, तो कोण कुठला याची चौकशी न करताच, ‘शेवंते, पाय धवाला पानी हान, पावना आलाय’ अशी ‘हाकाटी’ (हाक) ओटीवर बसलेले कुटुंबप्रमुख करत. मग हातातलं कामा बाजूला ठेवून लगबगीनं ती पाण्याचा तांब्या घेऊन उंबरठय़ापाशी उभी राही. तिच्या लेखी तो पाहुणा कोणीही असला तरी माहेरचाच, त्यामुळे ती सर्व थकवा विसरून त्याच्या पाहुणचाराकडे लक्ष देई. शेवटच्या श्वासापर्यंत माहेरची ओढ जपणारी ही आगरी स्त्री आजही हा स्वभाव टिकवून आहे.

आलेल्या पाहुण्याला कुठे ठेवू असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटे. बैठकीत गरीब-श्रीमंती असेल परंतु आदरातिथ्यात मात्र गरीब-श्रीमंती एक झालेली या समाजात पाहायला मिळेल. पेहरावात गरिबी श्रीमंती दिसेल, पण मनातले भाव या समाजात सारखेच पाहायला मिळतात. यातच या आगरी समाजाचं वैशिष्टय़ दडलेलं आहे. या त्यांच्या गुणांमुळेच भुकेलेल्यांचं मन ते ओळखतात व जातीपातीच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याला आपलंसं करतात.

घरात अठराविशे दारिद्रय़ असलं तरी पाहुण्यांचा पाहुणचार वडे-शागोतीनेच होणार हे ठरलेलं असतं. सोबत तांदळाची भाकरी. ‘बाला माचीवरशी (कोंबडय़ांना बसण्यासाठी पडवीत अथवा झाडावर केलेली जागा) तो आरवता कोंबरा धरून हान, शागोती कराची हाय’ ही हाक मी काही वेळापूर्वी ऐकली होती.

ताट पुढय़ात, ताटात अनेक जिन्नस. शागोती, चपटे वडे (तांदळाच्या पिठात गूळ घालून तळून केलेले गोल चपटय़ा आकाराचे वडे), तांदळाची भाकरी, कुरडया इ. पंगत जमली. आग्रह तर ठरलेलाच. पहिल्या आग्रहानेच पोटं भरली पण थांबते ती आगरी स्त्री कशी. वारंवार वाढल्याशिवाय तिला चैन पडणं कठीण.

निघतानाही पाहुण्यांच्या हातात पापडय़ा, कुरडयांनी भरलेल्या पिशव्या दिल्या जातात. आल्यापासून ते जाईपर्यंत कुठेच न पाहिलेलं आदरातिथ्य पाहून नवखा पाहुणा अवाक्च होतो.

तांदळाचे लाडू

पाहुणा बसतो ना बसतो तोच ‘लारू नं पानी हान पावनंला’ अशी यजमानांची हाक आणि त्याच्या पुढय़ात पारंपरिक पद्धतीने तयार केलेले तांदळाचे लाडू व पाण्याचा कप ठेवला जाई. भातशेती मुख्य पीक त्यामुळे बहुतेक पदार्थ हे तांदळाचेच असत. हे लाडू तांदूळ भाजून, जात्यावर दळून त्यात गूळ मिसळून बनवले जात. हा आगरी लोकांचा आवडीचा व पारंपरिक पदार्थ, याची चव न चाखलेला आगरी माणूस सापडणे कठीण. हवरटासारखा अख्खा लाडू तोंडात कोंबला तर पंचाईत ठरलेलीच. हे लाडू हळूहळू खायचे असतात नाहीतर तोंडातून बाहेर उडण्याची शक्यता असते. कारण ते ‘सुकमुंडे’ (कोरडे) असतात. तांदूळ तव्यावर भाजताना, जात्यावर दळताना, गुळाबरोबर एकजीव करताना आणि वळताना, घरोघरच्या अन्नपूर्णा सासर-माहेरचं वर्णन करणारी पारंपरिक गाणी म्हणतात. कदाचित त्यामुळेच या लाडूंनी अवीट गोडवा येत असावा.

dr.sanjeev.ranjana@gmail.com