X

सॅलड सदाबहार : कमळकाकडीचे सॅलड

कमळकाकडी किंवा कमळाचा देठ हे काश्मिरी, सिंधी, पंजाबी खाद्यसंस्कृतीमध्ये वापरल्याचे दिसून येते.

शेफ नीलेश लिमये

कमळकाकडी किंवा कमळाचा देठ हे काश्मिरी, सिंधी, पंजाबी खाद्यसंस्कृतीमध्ये वापरल्याचे दिसून येते. तसाच मखण (मखाना) म्हणजे कमळाचा बी याचाही खूप प्रमाणात उपयोग करतात. कमळाच्या देठामध्ये भरपूर पोषणमूल्य असते. ही कमळकाकडी महाराष्ट्रात सहज उपलब्ध असते. मुळासारखे दिसणारे देठ मातीने माखलेले असतात. वापरायच्या आधी ते पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे आवश्यक असते. तसेच त्याचे बारीक काप करून पाण्यात व्हिनेगार किंवा लिंबाचा रस घालून १०-१५ मिनिटे भिजत ठेऊन त्यातील माती स्वच्छ धुऊन वापरण्यास योग्य असते. पाण्यात न भिजवता ठेवली तर देठांचे काप काळे पडतात त्यासाठी देठ भिजवून झाल्यावर उकळत्या पाण्यातून ब्लांच करून घ्यावी. त्यातही १-२ चमचे व्हिनेगार घालावे म्हणजे ते पांढरे शुभ्र राहतात.

साहित्य

* कमळकाकडीची २-३ देठे, १ पिवळी आणि लाल भोपळी मिरची, ५-६ चेरी टोमॅटो, लेटय़ूस.

*  ड्रेसिंगसाठी – २ चमचे ब्राउन व्हिनेगर, २ चमचे सॅलड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा १ चमचा तिळाचं तेल, १ चमचा मोहरीची पेस्ट किंवा पूड, चवीकरता चिल्ली फ्लेक्स, मीठ, मिरपूड.

कृती

वर सांगितल्याप्रमाणे कमळकाकडी धुऊन, बारीक काप करून ब्लांच करून घ्यावी. थंड करायला फ्रिजमध्ये ठेवावी. ड्रेसिंगचे सर्व साहित्य बाऊलमध्ये घेऊन ढवळून घ्यावे. भोपळी मिरची लांबट चिरून घ्यावी. चेरी टोमॅटोही कापून घ्यावेत. एका वाडग्यामध्ये लेटय़ूस ठेवावा. त्यावर ब्लांच केलेली कमलकाकडी ठेवावी. त्यात भोपळी मिरची, चेरी टोमॅटो एकत्र करावे. यावर ड्रेसिंग घालावे. मीठ, मिरपूड आणि चिल्ली फ्लेक्स भुरभुरावे. हे मस्त सॅलड फस्त करण्यास तयार आहे!

nilesh@chefneel.coms