29 May 2020

News Flash

वसईचा खाद्यठेवा : पाचभेळी भाजी

पाचभेळी भाजी म्हणजे पाच प्रकारची कडधान्ये एकत्र करून तयार करण्यात आलेली भाजी होय.

अर्चना निशांत राऊत

नमस्कार मंडळी!

श्रावण सुरू झाला की सुरू होतात सणवार आणि उपासतापास. त्याच सोबत मग स्वयंपाकघरात सुरू होते निरनिराळ्या पदार्थाची आणि मिष्टान्नाची रेलचेल. श्रावणातला रिमझिम पाऊस आणि सोबतच गोडाधोडाचे पदार्थ, मस्त चमचमीत भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, विविध प्रकारची लोणची अशा वेगवेगळ्या पदार्थाचा फक्कड बेत असतो.

सणाच्या दिवशी आणि उपवासाच्या दिवशी भाज्या आणि गोडधोड काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न असतो. पण बऱ्याचदा असं होतं की, सणासुदीला आपण आपले पारंपरिक पदार्थच बनवत असतो. मग त्यात भाज्यांचे प्रकार असू देत किंवा गोडाधोडाचे पदार्थ असू देत.

आता या आठवडय़ात येणारा सण म्हणजे गोकुळाष्टमी. वसईतील भंडारी समाजात प्रत्येकाच्या घरोघरी हा सण साजरा करतात. या दिवशी चौरंगावर कृष्णाची मूर्ती किंवा तसबीर ठेवून त्याभोवती फुलांची आरास केली जाते. समई प्रज्वलित केल्या जातात. सुगंधी उदबत्ती किंवा धूप लावला जातो. रात्री १२ वाजता कृष्णाची पूजाअर्चा करून आरती केली जाते आणि कृष्णास पंचपक्वांनांचा नैवेद्य अर्पण करतात. या नैवेद्यात पाच प्रकारचा फराळ, पाच प्रकारचे गोड पदार्थ, अळूवडी, आमटी, पुरी किंवा चपाती, कोशिंबिरी आणि त्याच सोबत पाचभेळी भाजी असते.

पाचभेळी भाजी म्हणजे पाच प्रकारची कडधान्ये एकत्र करून तयार करण्यात आलेली भाजी होय. यामध्ये आवडीच्या कोणत्याही पाच कडधान्यांचा समावेश करू शकतो. पाच प्रकारची कडधान्ये एकत्रित करून तयार केलेलीच भाजी का बरं करत असणार, असा प्रश्न नक्कीच पडतो. असं असू शकते की, पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं आपण नेहमीच टाळतो किंवा पावसाळ्यात तशा त्या मुबलक प्रमाणात किंवा तितक्या उत्कृष्ट प्रतीच्या मिळत नसाव्यात, मग यावर पर्याय म्हणून सर्व प्रकारची कडधान्ये एकत्र करून प्रसाद म्हणून ही भाजी बनवत असणार.

कृष्ण हा गोपगोपिका आणि सवंगडय़ांसह रमणारा. रानात आपल्या मित्रांना घेऊन गाई चरायला जाई आणि भोजनसमयी प्रत्येकाची शिदोरी उघडून ती एकत्रित करून त्याचा काला करत आणि सर्वाना खायला देत असे. परंतु आपण आज ज्या युगात राहात आहोत तिथे अशाप्रकारे एकत्र जमून काला करून खाणं शक्य नसेल कदाचित म्हणून पाच सहा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या करण्यापेक्षा सर्व प्रकारची कडधान्ये एकत्र करून भाजी करण्याची प्रथा प्रचलित झाली असावी. पाचभेळी भाजी करण्यामागे कारणं काहीही असू देत, पण ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. परंपरागत चालत आलेली ही भाजी आजही भंडारी समाजात आवर्जून बनवतात.

’ साहित्य : एक वाटी आपल्या आवडीनुसार भिजवलेले कडधान्ये, एक मध्यम आकाराचा कांदा, एक छोटा टोमॅटो, एक चमचा मिरची आणि आल्याचा ठेचा, पाव वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, आवडत असल्यास गूळ, फोडणीकरिता तेल, जिरे, मोहरी आणि चवीनुसार मीठ.

’ कृती : प्रथम एका कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जिरे मोहरीची खमंग फोडणी करावी व बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो परतून घ्यावा. कांदा व टोमॅटो चांगला परतून झाला की त्यात आलं मिरचीचा ठेचा, लाल तिखट, हळद, मीठ घालावे. मिश्रण चांगले परतून त्याला तेल सुटू लागल्यावर त्यात दोन वाटी पाणी घालून भिजवलेली कडधान्ये, ओलं खोबरं, गूळ आणि गरम मसाला घालून कुकरला तीन ते चार शिट्टय़ा काढाव्यात. भाजी सव्‍‌र्ह करताना वरून कोथिंबीर आणि नारळ घालावा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 2:53 am

Web Title: vasai food culture food from vasai zws 70
Next Stories
1 ‘आयुध निर्माण’चे कामगार संपावर
2 मुंब्र्यात तरुणांचा वर्दीवर हात, वाहतूक पोलिसांचे कपडे फाडले; भररस्त्यात केली मारहाण
3 औद्योगिक वसाहतींमध्ये घरे
Just Now!
X