नीलेश लिमये nilesh@chefneel.com

व्हिएतनामला गेलात तर ठिकठिकाणी तुम्हाला या नूडल फोचे स्टॉल्स दिसतील. आपली कशी मिसळ असते तशी ही मांसाहारी व्हिएतनामी मिसळ, असे ढोबळ मानाने म्हणता येईल.

फो स्टॉकसाठी

१ लिटर चिकन स्टॉक किंवा व्हेज स्टॉक (साधारण ४ सूप बाउल साठी), २ चक्रीफुले, थोडी दालचिनी, बारीक चिरलेला पातीचा कांदा, आलं-लसूण ठेचलेले, लेमनग्रास, उकडलेल्या नूडल्स, ४ चमचे तिळाचे तेल.

चिकन स्टॉकमध्ये उकडून घेतलेले पाव किलो चिकन किंवा शाकाहारी फो करायचा असल्यास आवडत्या भाज्यांचे काप (फ्लॉवर, बटाटा, गाजर, फरसबी, भोपळी मिरची, मशरुम इ.) व्हेज स्टॉकमधून ब्लांच करून घेतलेले.

चवीसाठी – चिली सॉस, चिंचेची चटणी, मोड आलेले आणि वाफवलेले मूग, पालकाची पाने. सजावटीसाठी – खारे दाणे, कोथिंबीर, पुदिना, तळलेली लसूण, तळलेला कांदा.

कृती :

एका भांडय़ात स्टॉक घ्या. (शाकाहारींनी व्हेज स्टॉक तर मांसाहारीनी नॉनव्हेज स्टॉक घ्यावा.) यात चक्रीफूल, दालचिनी, लेमन ग्रास, ठेचलेले आले-लसूण घालून उकळून घ्या. या स्टॉकला सगळ्या मसाल्यांचा छान सुवास यायला हवा, इतपत तो उकळा.

आता ज्यामध्ये फो खाणार आहोत, त्यात आधी नूडल्स, उकडलेल्या चिकनचे पातळ काप, भाज्या घाला. त्यात चवीसाठी म्हणून घेतलेले चिली सॉस, चिंचेची चटणी, पालकाची पाने, उकडलेले मूग घाला. आता यावर उकळलेला स्टॉक घालून त्यावर सजावटीसाठी खारे दाणे, कोथिंबीर, पुदिना, तळलेली लसूण, तळलेला कांदा पेरा. वरून तिळाचे तेल शिंपडा. हा पौष्टिक आणि चविष्ट फो नक्की करून पाहा.