Snack Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, पण नेहमीचे पोहे, भजी, वडा किंवा सँडविच खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी एक भन्नाट रेसिपी करून पाहा. घरात सहज उपलब्ध असलेल्या बटाट्यांपासून तुम्ही आलू चीज रिंग्स तयार करू शकता.

दिसायला आकर्षक, बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजचा मऊ स्वाद असलेला हा स्नॅक मुलांनाही नक्की आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची किंवा तासन्‌तास स्वयंपाकघरात उभं राहण्याची गरज नाही.

साहित्य

  • उकडलेले बटाटे -३
  • किसलेले चीज – १/२ कप
  • कॉर्नफ्लोअर- २ चमचे
  • तांदळाचे पीठ – २ चमचे
  • चिली फ्लेक्स- १/२ चमचा
  • ओरेगानो – १/२ चमचा
  • काळी मिरी पावडर – १/४ चमचा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • ब्रेडक्रम्ब्स – १ कप
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात चांगले मॅश करून घ्या. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, चिली फ्लेक्स, ओरेगानो, काळी मिरी, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचा घट्ट गोळा मळून घ्या.

आता या मिश्रणाचा थोडा भाग घेऊन हाताने किंवा लाटण्याच्या मदतीने जाडसर पोळीप्रमाणे पसरवा. त्यावर किसलेले चीज पसरवा आणि त्यावर पुन्हा बटाट्याचे मिश्रण ठेवून हलक्या हाताने दाबा. आता गोल कटर किंवा वाटीच्या मदतीने गोल आकार कापून घ्या. मधला भाग छोट्या झाकणाच्या मदतीने कापून काढा. अशा प्रकारे रिंगचा आकार तयार होईल.

तयार रिंग्स काही मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे त्या तळताना फुटणार नाहीत. नंतर प्रत्येक रिंग ब्रेडक्रम्ब्समध्ये हलक्या हाताने घोळवून घ्या.

कढईत तेल गरम करून रिंग्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम आलू चीज रिंग्स टोमॅटो सॉस, मेयोनेझ किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.