How To Make Crispy Onion Pakoda at Home: पावसाचे थेंब खिडकीवर अलगद पडत असताना हातात वाफाळत्या चहाचा कप आणि सोबत गरमागरम कांदा भजी… हा अनुभव अनेकांच्या आवडत असतो. पावसाळा सुरू झाला की, घराघरात भजी, वडे आणि गरम स्नॅक्सची चर्चा रंगू लागते. मात्र, अनेकदा घरी बनवलेली कांदा भजी चविष्ट तर होतात; पण हॉटेल किंवा हलवाईंच्या दुकानातील भज्यांसारखी खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाहीत.

मग हलवाई नेमकी अशी कोणती युक्ती वापरतात, ज्यामुळे त्यांची कांदा भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही महागड्या पदार्थाची गरज नसते. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही साध्या घटकांमुळे ही जादू घडू शकते.

पावसाळ्यात पाहुणे अचानक घरी आले किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली, तर ही रेसिपी नक्की उपयोगी पडू शकते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच कांदा भजी आवडतात. त्यामुळे ही रेसिपी घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरू शकते.

लागणारे साहित्य

  • २ कप बारीक चिरलेला लाल कांदा
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा काश्मिरी लाल तिखट
  • २ चमचे बारीक चिरलेले आले
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ चमचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चिमूटभर हिंग
  • १ कप बेसन
  • २ मोठे चमचे तांदळाचे पीठ
  • २ मोठे चमचे तेल
  • चिमूटभर हळद
  • १ चमचा चाट मसाला
  • तळण्यासाठी तेल
    भजी कुरकुरीत होण्याचं गुपित काय?

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कांदा, मीठ, तिखट, आले, कोथिंबीर, हिरवी मिरची व हिंग एकत्र करून घ्या. हे मिश्रण हाताने हलकेसे चोळून घ्या. त्यामुळे कांद्यामधून नैसर्गिक पाणी सुटण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे मिश्रण सुमारे १० मिनिटे तसेच ठेवून द्या.

याच टप्प्यात अनेक जण घाई करतात आणि भजी अपेक्षेइतकी कुरकुरीत होत नाहीत. कांद्यामधून निघणारे हे नैसर्गिक पाणीच पुढे भज्यांची चव वाढवण्यास उपयोगी पडते.

त्यानंतर त्यात बेसन, तांदळाचे पीठ आणि थोडे तेल घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. तांदळाच्या पिठामुळे भज्यांना खास कुरकुरीतपणा मिळतो. आता त्यात हळद आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.

तळताना ही चूक करू नका

कढईत तेल गरम करा. तेल व्यवस्थित तापल्यावर आच मध्यम करा आणि हाताने भज्यांचे छोटे छोटे गोळे तेलात सोडा. भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कढईत एका वेळी खूप भजी टाकू नका. त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि भजी नरम पडू शकतात. भजी दोन्ही बाजूंनी समान स्वरूपात तळली गेली पाहिजेत.

तयार झालेली गरमागरम कांदा भजी टिश्यू पेपरवर काढा. त्यावर हलकासा चाट मसाला भुरभुरा आणि वाफाळत्या चहासोबत लगेच सर्व्ह करा.

पावसाळ्यातील वातावरणात गारवा पसरलेल्या एखाद्या संध्याकाळी ही कुरकुरीत कांदा भजी घरभर सुगंध पसरवतील आणि प्रत्येक घासासोबत पावसाचा आनंद आणखी वाढवतील.