Easy Snack Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. मात्र रोजच्या रोज बटाटेवडे, भजी किंवा समोसे खाण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध पदार्थांपासून एखादा झटपट आणि चविष्ट पदार्थ करून पाहायला काय हरकत आहे?

पोहे, बटाटा आणि काही मोजके मसाले वापरून तुम्ही अगदी कमी वेळात पोहे कटलेट तयार करू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे कटलेट चहा किंवा हिरव्या चटणीसोबत खायला भन्नाट लागतात.

साहित्य

  • २ वाट्या जाडे पोहे
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • २ चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या आणि साधारण ५ मिनिटे तसेच ठेवून द्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात भिजवलेले पोहे आणि उकडलेले बटाटे एकत्र घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घाला.

आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगले मळून घ्या. मिश्रण खूप सैल वाटत असल्यास त्यात तांदळाचे पीठ किंवा रवा घाला. यामुळे कटलेटला चांगला आकार येण्यास मदत होईल.

तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून त्यांना कटलेटचा आकार द्या. एका कढईत तेल गरम करून कटलेट मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

गरमागरम पोहे कटलेट हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा. कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल.