Evening Snack Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायचं असेल, पण नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरात असलेल्या तांदळाच्या पापडांपासून तयार होणारे क्रिस्पी कप्स दिसायला अगदी हटके आणि चवीला जबरदस्त लागतात. विशेष म्हणजे यासाठी पीठ भिजवणे, तासभर तयारी करणे किंवा फार काही साहित्य लागणार नाही. झटपट तयार होणारा हा स्नॅक अचानक पाहुणे आले तरी करता येतो.

साहित्य

  • ६-८ तांदळाचे पापड
  • १ उकडलेला बटाटा
  • ½ कप बारीक चिरलेला कांदा
  • ¼ कप बारीक चिरलेली शिमला मिरची
  • २ चमचे उकडलेले स्वीट कॉर्न
  • २ चमचे शेव
  • २ चमचे कोथिंबीर
  • १ चमचा चाट मसाला
  • ½ चमचा लाल तिखट
  • १ चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम उकडलेला बटाटा एका भांड्यात घेऊन हलका मॅश करून घ्या. त्यामध्ये कांदा, शिमला मिरची, स्वीट कॉर्न, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

आता तांदळाचा एक पापड घ्या आणि तो गरम तेलात काही सेकंदांसाठी तळा. पापड पूर्णपणे कडक होण्याआधीच त्याला चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने कपचा आकार द्या. आकार सेट झाल्यानंतर तो तेलातून बाहेर काढा. अशाच प्रकारे सर्व पापडांचे कप तयार करा.

तयार झालेल्या क्रिस्पी कपमध्ये बटाट्याचे तयार केलेले मिश्रण भरा. वरून थोडी शेव आणि कोथिंबीर घाला. आवडत असल्यास थोडी हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणीही घालू शकता.

तयार आहेत कुरकुरीत तांदळाच्या पापडाचे कप्स! हा स्नॅक लगेच सर्व्ह करा, कारण पापडाचा कप कुरकुरीत असतानाच त्याची खरी मजा येते.