Tea Snack Recipe: संध्याकाळच्या चहासोबत नेहमी बिस्किटं, पोहे किंवा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तयार होणारे कुरकुरीत पोटॅटो पॉकेट्स हा भन्नाट पर्याय आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार बटाट्याचं सारण असलेला हा स्नॅक खायला अतिशय चविष्ट लागतो. विशेष म्हणजे, यासाठी मैदा किंवा बाजारातून आणलेला रेडीमेड बेस वापरण्याची गरज नाही.

साहित्य

पोटॅटो पॉकेट्ससाठी

  • १ कप तांदळाचं पीठ
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • २ चमचे कोथिंबीर
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • १ चमचा तेल
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात चांगले कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून बटाट्याचं सारण तयार करून घ्या.

आता एका कढईत एक कप पाणी, एक चमचा तेल आणि थोडं मीठ घालून उकळी आणा. पाणी उकळल्यानंतर गॅस मंद करा आणि त्यात तांदळाचं पीठ घाला. चमच्याने सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा आणि ते थोडं कोमट होऊ द्या.

हाताला थोडं तेल लावून या मिश्रणाचा छोटा गोळा घ्या आणि हाताने त्याची पातळ पुरीसारखी वाटी तयार करा. त्यामध्ये तयार केलेलं बटाट्याचं सारण भरा आणि कडा व्यवस्थित बंद करा. अशाच प्रकारे सर्व पॉकेट्स तयार करून घ्या.

आता कढईत तेल गरम करून हे पॉकेट्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम पोटॅटो पॉकेट्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

कुरकुरीत बाहेरचा थर आणि मसालेदार बटाट्याचं सारण यामुळे हा हटके स्नॅक नक्कीच सगळ्यांना आवडेल.