Diwali Chakli Recipe: दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा आणि चकली अशा विविध पदार्थांनी फराळाचं ताट सजवलं जातं. यामध्ये कुरकुरीत आणि खमंग चकलीला विशेष पसंती दिली जाते. बाजारातून चकली विकत आणण्याऐवजी तुम्ही यंदा अगदी सोप्या पद्धतीने घरीच भाजणीची चकली बनवू शकता. ही चकली चवीला छान लागते आणि योग्य पद्धतीने बनवल्यास अनेक दिवस कुरकुरीत राहते. चला तर मग, जाणून घेऊया दिवाळीच्या फराळासाठी भाजणीची चकली बनवण्याची सोपी रेसिपी.

चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य

  • २ वाट्या चकलीची भाजणी
  • १ चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा तीळ
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे गरम तेल
  • गरजेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल

चकली बनवण्याची कृती

स्टेप १ : सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात चकलीची भाजणी घ्या. त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरे, तीळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

स्टेप २ : आता या मिश्रणात गरम तेल घाला. चमच्याने किंवा हाताने हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा पातळ ठेवू नका.

स्टेप ३ : तयार पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर चकलीच्या साच्याला थोडं तेल लावा आणि त्यामध्ये पीठ भरा.

स्टेप ४ : एका ताटात किंवा प्लास्टिकच्या कागदावर गोलाकार चकल्या पाडून घ्या. चकलीचा आकार व्यवस्थित येईल याची काळजी घ्या.

स्टेप ५ : कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर चकल्या हळूहळू सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

स्टेप ६ : तयार चकल्या टिश्यू पेपरवर काढून थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

अशा प्रकारे घरच्या घरी खमंग आणि कुरकुरीत भाजणीची चकली तयार होईल. यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना घरच्या हातची चकली नक्की खाऊ घाला!