Potato Sev Recipe: दिवाळीचा सण म्हटलं की घराघरांत फराळाची तयारी सुरू होते. चकली, चिवडा, लाडू, करंजी यांसोबत शेव हादेखील फराळातील आवडता पदार्थ आहे. यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या बेसनाच्या शेवेऐवजी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर बटाट्याची कुरकुरीत शेव नक्की करून पाहा. ही शेव बनवायला अगदी सोपी असून चवीला खूप छान लागते. विशेष म्हणजे यासाठी घरात सहज उपलब्ध असणारे साहित्य पुरेसे आहे. चला तर जाणून घेऊया बटाट्याची कुरकुरीत शेव बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
- ३ मध्यम आकाराचे बटाटे
- १ कप बेसन
- २ चमचे तांदळाचे पीठ
- १ चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा जिरे पूड
- चवीनुसार मीठ
- चिमूटभर हिंग
- १ चमचा गरम तेल
- तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकडून घ्या. बटाटे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून चांगले मॅश करा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
आता मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, जिरे पूड, हिंग आणि मीठ घाला.
या मिश्रणात एक चमचा गरम तेल घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मऊ आणि घट्ट पीठ मळून घ्या.
शेव बनवण्याच्या साच्याला थोडे तेल लावा. त्यामध्ये तयार केलेले पीठ भरून ठेवा.
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यानंतर शेवच्या साच्याने गोलाकार शेव थेट तेलात सोडा.
शेव दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ती टिश्यू पेपरवर काढा.
शेव पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
अशा प्रकारे तुमची चविष्ट आणि कुरकुरीत बटाट्याची शेव तयार आहे. दिवाळीच्या फराळात ही शेव चिवडा आणि इतर पदार्थांसोबत सर्व्ह करा. चहासोबत खायलाही ती उत्तम लागते. यंदा दिवाळीत ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा!
