Diwali Karanji Recipe: दिवाळी म्हटलं की घरोघरी फराळाची तयारी सुरू होते. चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी यांसोबत करंजी हा फराळातील आवडीचा पदार्थ आहे. खुसखुशीत आवरण आणि आतमध्ये गोडसर नारळाचं सारण असलेली करंजी खायला प्रत्येकालाच आवडते. यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर रवा आणि नारळ वापरून खास करंजी तयार करू शकता. ही रेसिपी बनवायला सोपी असून चहासोबत खायलाही छान लागते. चला तर जाणून घेऊया रवा नारळ करंजी बनवण्याची सोपी पद्धत.

करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

आवरणासाठी साहित्य :

  • १ वाटी बारीक रवा
  • अर्धी वाटी मैदा
  • २ चमचे गरम तूप
  • चिमूटभर मीठ
  • गरजेनुसार दूध किंवा पाणी
  • तळण्यासाठी तेल

सारणासाठी साहित्य :

  • १ वाटी सुके खोबरे (किसलेले)
  • अर्धी वाटी पिठीसाखर
  • २ चमचे खसखस
  • २ चमचे काजू-बदामाचे तुकडे
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • १ चमचा तूप

रवा नारळ करंजी बनवण्याची कृती

स्टेप १ : सर्वप्रथम एका भांड्यात रवा आणि मैदा घ्या. त्यामध्ये गरम तूप आणि चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. थोडं थोडं दूध किंवा पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ झाकून २० ते २५ मिनिटे बाजूला ठेवा.

स्टेप २ : आता कढईत तूप गरम करून त्यामध्ये खसखस आणि किसलेलं खोबरं घाला. मंद आचेवर खोबरे हलकं भाजून घ्या. त्यानंतर त्यात काजू-बदामाचे तुकडे घाला.

स्टेप ३ : मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर आणि वेलची पूड घालून सारण तयार करा.

स्टेप ४ : तयार पिठाचे छोटे गोळे करून पातळ पुऱ्या लाटा. त्यामध्ये तयार सारण भरा. पुरीच्या कडांना थोडं पाणी लावून अर्धचंद्राकार घडी घाला आणि कडा व्यवस्थित बंद करा.

स्टेप ५ : कढईत तेल गरम करून करंज्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

स्टेप ६ : तयार करंज्या पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

अशा प्रकारे घरच्या घरी खुसखुशीत आणि चविष्ट रवा नारळ करंजी तयार होईल. यंदाच्या दिवाळीत या खास करंजीने फराळाची रंगत नक्की वाढवा!

टीप : करंजीचे आवरण कुरकुरीत होण्यासाठी पीठ घट्ट मळा आणि करंज्या मंद ते मध्यम आचेवर तळा.