Fast Easy Recipe: उपवास म्हटलं की बटाटा किंवा साबुदाणा हेच पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण यंदा नवरात्रीत नाश्त्यासाठी रताळ्याचे चीज-कटलेट करून पाहा. गोडसर रताळे, कुरकुरीत शेंगदाणे आणि आतून वितळणारं चीज यांचा भन्नाट स्वाद या कटलेटमध्ये मिळतो. कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ मुलांनाही आवडू शकतो.
साहित्य
२ मोठी उकडलेली रताळी, ३ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, २ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून कोथिंबीर, १ चमचा जिरे, चवीनुसार सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, थोडा लिंबाचा रस, चीजचे छोटे तुकडे आणि तूप.
कृती
सर्वप्रथम उकडलेली रताळी सोलून एका भांड्यात चांगली मॅश करून घ्या. त्यात कुटलेले भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, काळी मिरी, सैंधव मीठ आणि लिंबाचा रस घाला.
सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घट्ट मिश्रण तयार करा. आता हाताला थोडे तूप लावून या मिश्रणाचा छोटा भाग घ्या. त्याच्या मध्यभागी चीजचा एक छोटा तुकडा ठेवून मिश्रण बंद करा आणि गोल किंवा चपट्या कटलेटचा आकार द्या.
तवा गरम करून त्यावर थोडे तूप सोडा. कटलेट तव्यावर ठेवून मंद आचेवर भाजायला सुरुवात करा. एका बाजूला सोनेरी रंग आला की अलगद पलटवा. दोन्ही बाजू कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत भाजा.
कटलेट गरम असतानाच सर्व्ह करा. कापल्यावर आतून चीजचा थर दिसल्यामुळे हा पदार्थ आणखी आकर्षक वाटतो. सोबत दही किंवा उपवासाला योग्य चटणी दिल्यास नाश्ता पूर्ण होईल.
नवरात्रीच्या फराळात नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करून पाहायचं असेल, तर रताळ्याचे हे चीज-कटलेट एक चविष्ट पर्याय ठरू शकते.
