Gatari 2024 Special Non- veg Recipe: श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती ‘आषाढी अमावस्या’ ज्याला अलीकडे ‘गटारी अमावस्या’ असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच. तुम्हीही जर गटारीचा बेत आखत असाल तर या गटारीला या रेसिपी नक्की ट्राय करा. कुरकुरीत मच्छी फ्राय (Crispy fish fry) आपल्या आवडीप्रमाणे कोणताही मासा घ्यावा. स्वच्छ धुवून घेतलेल्या या माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे. तासाभरानंतर मॅरीनेट केलेल्या माशाचे तुकडे रवा अथवा तांदळाच्या पिठात घोळा. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तुकडे शेलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने मासे खरपूस घ्यावेत. हिरव्या चटणीसोबत हे मच्छी फ्राय सर्व्ह करा अंड्याचे कबाब (Egg kebabs) तीन ते चार अंडी उकडून घ्या. ही उकडलेले अंडी किसून घ्या. यात बारीक चिरलेली कोथिंबीर,गरम,मसाला,लाल तिखट, पाणी, मीठ,दोन चमचे चन्याच्या डाळीचे पीठ, कांदा, काळीमिरपूड घालून एकत्र मिसळा. गरजेपुरती पाणी घाला. अंड्याचे मिश्रण चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे गोलाकार कबाब बनवा.हे कबाब ब्रेडक्रम्ब्स मध्ये घोळवून हे कबाब तेलात तळून घ्या. सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.हिरवी चटणी किंवा सॉस सह गरम कबाब सर्व्ह करा. गार्लिक चिकन ( Garlic chicken) प्रथम चिकनला मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही, एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मॅरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कस्तूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. हेही वाचा >> Gatari 2024: गटारीनिमित्त घरच्या घरी बनवा ‘या’ लज्जतदार आणि झणझणीत नॉनव्हेज रेसिपी झणझणीत मटण (Mutton recipe) मटण स्वच्छ करुन, त्याच्या तुकड्यांना १ लहान चमचा तेल हळद व मीठ लावून ठेवा. एका बटाट्याचे ४ लांब तुकडे असे सर्व बटाटे चिरुन तेलात तळून घ्या. टॉमेटो बारीक तिरा. कांदे पातळ उभे चिरा. कांदा, लसूण व आलं वाटून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा. ते झाल्यावर त्यामध्ये मिरे घाला. ते तडतडायला लागले की, कांदा व तमालपत्र घालून परता. कांद्याचा रंग जरासा बदलत असल्याचे कळताच त्यात वाटलेला मसाला घाला. गॅस बारीक करा. टॉमेटो घालून चांगले शिजू द्या. हळद, जिरेपूड, धणेपूड व तिखट घाला. नंतर मीठ घालून परता. अर्धी वाटी पाणी घालून मसाला चांगला शिजू द्या. झाकण ठेवा. मसाल्याला तेल सुटू लागल्यावर मटणाचे तुकडे घालून चांगले खालीवर ढवळा. दीड वाटी पाणी घालून पुन्हा चांगले ढवळून गॅस मोठा करा. कुकरचे झाकण बंद करुन तीन ते चार शिट्या काढा. गॅस बंद करा. झाकण निघाले की तयार पदार्थाला ‘मांस कसा’ म्हटले जाते. पुढे त्यात ३ वाट्या पाणी घालून परत गॅस सुरु करा,. उकळी फुटल्यावर त्यात तळलेला बटाटा सोडा. परत झाकण लावून एक शिटी काढा आणि गॅस बंद करा. झाकण उघडल्यावर परत एकदा गॅस लावून कुकर त्यावर ठेवा. चमचाभर तूुप सोडून कोथिंबीर घालून झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.