Malvani Prawns Curry Recipe: मासे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, यात बिन काट्याचे मासे अनेकजण आवडीने खातात. विशेषत: बऱ्याच लोकांना कोळंबी हा मच्छीचा प्रकार अधिक आवडतो. यामुळे कोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जाते. यात तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे कोळंबीपासून तयार होणारे पदार्थ ऐकले असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी रविवार स्पेशल अस्सल झणझणीत 'मालवणी कोळंबी सार' कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. यामुळे चला जाणून घेऊन कसा बनवायचा मालवणी कोळंबी सार…. मालवणी पद्धतीने कोळंबी सार बनवण्यासाठी लागणारे साहित्य १) अर्धा किलो नीट सोलून, स्वच्छ करुन घेतलेली कोळंबी कोळंबीच्या साराचे वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य १) अर्ध्या नारळाचे खोबरे२) एक छोटा टोमॅटो३) अर्धा कांदा४) ५ ते ६ लसूण पाकळ्या५) १ टी स्पून हळद६) हिंग७) दोन चमचे भिजवून घेतलेले धणे८) एक टी स्पून हिंग९) ५- ६ पाकळ्या तिरफळ१०) १० बेडकी मिरची११) आल्याचा एक छोटा तुकडा साराच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य १) ३ लसणाच्या पाकळ्या२) ४ ते ५ कोकम३) कोथिंबीर४) बारीक चिरलेले कांदा५) चवीनुसार मीठ कोळंबीचा सार बनवण्याची कृती सर्वप्रथम बेडकी मिरच्या, धणे, तिरफळ गरम पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. यानंतर या मिश्रणात ६-७ लसणीच्या पाकळ्या, आल्याचा एक छोटा तुकडा, टोमॅटो, हळद आणि एक चमचा हिंग मिक्सरमध्ये टाकून नीट वाटून घ्या, आता त्यात कांदा, किसलेलं खोबरं आणि थोडं पाणी टाकून पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन वाटण तयार करा. आता कडईत तेल गरम करत ठेवा, तेल गरम होताच त्यात ठेचून घेतलेल्या लसणाच्या २-३ पाकळ्या टाका, या पाकळ्या थोड्या लालसर होताच त्यात अर्धा चिरून घेतलेला कांदा टाका. हे मिश्रणही दोन मिनिटे नीट परतून घ्या. आता त्यात तयार केले वाटण टाकून पुन्हा दोन मिनिटे नीट परतून घ्या. यानंतर ३-४ कोकम टाकल्यानंतर सोलून स्वच्छ केलेली कोळंबी टाका आणि तीही नीट परतून घ्या. आता चवीप्रमाणे मीठ टाका आणि मिश्रण पुन्हा नीट परता यामुळे कोळंबीतील उग्रपणा कमी होतो. यानंतर तुम्ही सार किती पातळ हवे आहे त्यानुसार पाणी टाका. आता या साराला उकळी येईपर्यंत शिजू द्या. यावर तुम्ही कोथींबीर टाकू शकता. अशाप्रकारे तयार झाले तुमचे अस्सल मालवणी पद्धतीने तयार केलेला झणझणीत कोळंबी सार…