scorecardresearch

Gudi Padwa 2023 :गुढीपाडव्याचा खास बेत! कटाची आमटी बनवा ‘या’ सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला करा गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळीचा बेत

puranpoli and katachi aamati
पुरणपोळी आणि कटाची आमटी (सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सण-उत्सव म्हटलं घरोघरी रुचकर पदार्थांचा बेत आखला जातोच. गुढीपाडव्याच्या दिवशीही घरच्या घरी गोडधोड केलं जातं. सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरी पुरण पोळी हा ठरलेला बेत असतो. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा! आताच तोंडाला पाणी सुटलं ना ? पण ही पुरणपोळी सगळ्यांनाच जमते असं नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग बघुयात पुरणाची पोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची..

पुरणपोळी साहित्य –

१ कप चणा डाळ
१ कप किसलेला गूळ
एक कप मैदा
७ ते ८ टेबलस्पून तेल
१ चमचा वेलची पूड
मैदा

पुरणपोळी कृती –

  • सर्वात आधी कुकर घ्यावा आणि त्यामध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी काढून घ्यावे.
  • यानंतर डाळ एका भांड्यात घ्यावी. त्यामध्ये किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर हे मिश्रण चांगले ढवळत रहा. यावेळी हे मिश्रण चांगले ढवळले गेले नाही, तर ते करपू शकते. यासोबत यात वेलची पूड घालावी.
  • यानंतर हे मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घेणे गरजेचे आहे. मिश्रण थंड झाले की ते नीट वाटले जात नाही. यानंतर मैदा घ्यावा आणि त्यात ५ ते ६ चमचे तेल आणि थोडीशी हळद मिसळावी. नंतर हे पीठ मळून घ्यावे. हे पीठ २ तास ठेवून द्या.
  • यानंतर पुरणाच्या मिश्रणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्या. तर मैद्याच्या पीठाचे अर्धा ते एक इंचाचा गोळा तयार करा. त्यांनंतर त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
  • पोळी भाजताना नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर भाजावी. पुरणपोळी चांगली सोनेरी भाजली की भांड्यात न ठेवता कागदावर ठेवावी.

हेही वाचा – गुढीपाडव्याला ५ मिनिटात काढता येईल सुंदर रांगोळी, ‘या’ हटके डिझाईन लगेच सेव्ह करुन ठेवा

कटाची आमटी साहित्य –

दीड लिटर कट( पुरणाची डाळ शिजल्यावर गाळून काढलेले पाणी) २ चमचा मिरची पावडर,१ चमचा गरम मसाला, हळद, दीड चमचा मीठ, छोट्या लिंबाएवढी चिंच व तेवढाच गूळ, दीड चमचा तेल. फोडणीसाठी – पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, ७-८ कडिपत्त्याची पानं, वाटण – २ मोठे चमचे सुके खोबरे, २ मोठे चमचे ओले खोबरे ( दोन्ही गुलाबी रंगावर भाजून वाटावे)

कटाची आमटी कृती –

कटात सर्व मसाले, मीठ, चिंच, गूळ व खोबऱ्याचे वाटण घालून फोडणी द्या व चांगले उकळून गॅस बंद करा. कटाची आमटी पुरणपोळी खाताना तोंडी लावणी म्हणून घेतात तसेच गरमागरम तूपभातावर ही आमटी अप्रतिम लागते. तसेच ही आमटी आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खाल्ली तर छान मुरते आणि अजून चविष्ट लागते. या कटाच्या प्रसिद्ध आमटीला येळवण्याची आमटी असेही म्हटले जाते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या