Holi Special Puran Poli Recipe : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ हे वाक्य आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळीच्या दिवशी पुरणाची पोळी हमखास बनवली जाते. पण प्रत्येकाला मऊसूत पुरणपोळी जमतेच असं नाही.आपल्याकडे कोणताही सण म्हटलं की घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. पोळी काठापर्यंत मऊ आणि भरलेली कशी बनवायची? पुरण तयार करण्यापासून ते पोळी लाटण्यापर्यंतची सर्व गुपितं आणि खास टिप्स या होळी स्पेशल रेसिपीमध्ये नक्की जाणून घ्या. पुरणपोळी मऊ हवी असेल आणि योग्य गोडवा हवा असेल तर काही सोपे हॅक्स आम्ही या लेखातून तुम्हाला देणार आहोत.

पुरणपोळी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

पुरणपोळी करताना आपण हरबऱ्याची डाळ २ ते ३ वेळा पाण्याने धुवून घेतो आणि नंतर लगेच ती कुकरमध्ये शिजायला लावतो. पण असं करण्याऐवजी डाळ २ ते ३ तास पाण्यात घालून भिजत ठेवा आणि नंतर ती शिजवा. असं केल्याने डाळ आणखी मऊसूत शिजते आणि पुरण अगदी एकजीव होतं

पुरणपोळी साहित्य –

१ कप चणा डाळ
१ कप किसलेला गूळ
एक कप मैदा
७ ते ८ टेबलस्पून तेल
१ चमचा वेलची पूड
मैदा

पुरणपोळी कृती –

  • सर्वात आधी कुकर घ्यावा आणि त्यामध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी काढून घ्यावे.
  • यानंतर डाळ एका भांड्यात घ्यावी. त्यामध्ये किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर हे मिश्रण चांगले ढवळत रहा. यावेळी हे मिश्रण चांगले ढवळले गेले नाही, तर ते करपू शकते. यासोबत यात वेलची पूड घालावी.
  • यानंतर हे मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घेणे गरजेचे आहे. मिश्रण थंड झाले की ते नीट वाटले जात नाही. यानंतर मैदा घ्यावा आणि त्यात ५ ते ६ चमचे तेल आणि थोडीशी हळद मिसळावी. नंतर हे पीठ मळून घ्यावे. हे पीठ २ तास ठेवून द्या.
  • यानंतर पुरणाच्या मिश्रणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्या. तर मैद्याच्या पीठाचे अर्धा ते एक इंचाचा गोळा तयार करा. त्यांनंतर त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
  • पोळी भाजताना नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर भाजावी. पुरणपोळी चांगली सोनेरी भाजली की भांड्यात न ठेवता कागदावर ठेवावी.