scorecardresearch

१० मिनिटांत करा हॉटेलसारखा रंगीत पुलाव; नोट करा ही स्पेशल रेसिपी

(How to make pulao) दुपारच्या जेवणासाठी रोज काय नवीन बनवायचं हा प्रश्न पडलाय? तर हा रंगीत पुलाव नक्की ट्राय करा.

How to make pulao
रंगीत व्हेज पुलाव रेसिपी इन मराठी ( सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How to make pulao दुपारच्या जेवणासाठी रोज काय नवीन बनवायचं हा प्रश्न नेहमीच गृहिणींना पडलेला असतो. गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी मसालेदार चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी झटपट आणि टेस्टी काय बनवायचं या शोधात गृहिणी असतात. त्यातही आपलं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. अशातच आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील ‘रंगीत पुलाव’. रात्रीच्या जेवणासाठी काही गोड न बनवता तुम्ही व्हेज ‘रंगीत पुलाव’ बनवू शकता. मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा रंगीत पुलाव..

रंगीत पुलाव साहित्य –

चार वाट्या बासमती तांदूळ, दीड वाटी तूप, ५-६ लवंग, १ चमचा धने, दालचिनीचे बोटाएवढ्या लांबीचे २ तुकडे, २ चमचा जिरे, २ चमचा बारीक जायपत्री, १ चमचा मिरे, २ चमचे मीठ, पाव वाटी साखर, अर्धी वाटी काजू, ५-६ जरदाळू, २ मोठे कांदे, गाजराचे तुकडे पाव वाटी, मटार पाव वाटी, ५-६ चेरी, पाव वाटी बेदाणा, १०-१५ बदाम बी, पाव वाटी चिरलेली फरसबी, १ वाटी फ्लॉवरचे तुकडे, वाटीभर साईचे दही, १ जायफळ, चिमूटभर सोडा, दीड चमचा आल्याचा रस, अंदाजे सात वाट्या पाणी, दोन हिरव्या मिरचा, दोन सुक्या मिरच्या, २-३ पाकळ्या लसूण, १ ग्रॅम केशर.

रंगीत पुलाव कृती –

तांदूळ तुपावर परतून भात करुन घ्यावा. भात शिजताना त्यात मीठ व साखर घालावी. भात शिजल्यानंकर तो ताटात काढून मोकळा करावा. एक वाटी तूप गरम करुन त्या भातावर घालून भात सारखा करावा. नंतर त्या भाताचे चार भाग करावे. एका भागाला कोथिंबीर व हिरवी मिरची वाटून घालावी. किंचीत खाण्याचा हिरवा रंग घालावा. दुसऱ्या भागाला लाल मिरची व लसूण वाटून घालावे, तिसऱ्या भागाला केशर घालून कालवावे. चौथा भाग तसाच पांढरा ठेवावा. नंतर एक पातेले घेऊन त्यात प्रथम हिरव्या रंगाच्या भाताचा थर घालावा व त्यावर वाफवलेल्या गाजराचा किस घालावा. नंतर लाल रंगाच्या भाताचा थर घालावा व त्यावर वाफवलेल्या फरसबीचे तुकडे पसरवावे. नंतर पांढऱ्या रंगाच्या भाताचा थर घालावा व त्यावर वाफवलेले मटार व राहिलेल्या भाज्यांचा थर घ्यावा. शेवटी केशरी रंगाच्या भाताचा थर घालून त्यावर जरदाळू, बदाम, कांद्याचे काप, लवंग, बेदाणे, हे सगळे जिन्नस तळून घ्यावे. याप्रमाणे सर्व थर घातल्यावर हाताने भात सारखा धट्ट दाबून कूकरमध्ये ठेऊन वाफ येऊ द्यावी. त्यानंतर एका डिशमध्ये पुलाव काढून घ्या आणि वरुन कोथिंबीर गार्निश करुन रायत्यासोबत त्याचा आस्वाद घ्या.

हेही वाचा – ३० लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क!

तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 14:06 IST