scorecardresearch

गुढीपाडव्यासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत आखताय? जाणून घ्या रेसिपी

आज गुढीपाडव्यानिमित्त तुमच्यासाठी आम्ही श्रीखंड पुरीची रेसिपी आम्ही घेऊ आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

know how to make the recipe shrikhand puri for gudi padwa 2023
आज गुढीपाडव्यानिमित्त तुमच्यासाठी श्रीखंड पुरीची रेसिपी जाणून घ्या ( Image Credit : unplash)

आज २२ मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा होत आहे. महाराष्ट्राशिवाय आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये देखील हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून हिंदू नव वर्षाची सुरुवात होते त्यामुळे हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. घराबाहेर रांगोळी काढली जाते, दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. एका काठीला नवी कोरी साडी नेसून आणि त्यावर तांब्याचा गडवा लावून त्याला कडूलिंबाचा पाला, फुलांचा हार आणि साखरेची घाटी लावून गुढी उभारली जाते. सर्व जण पांरपारिक कपडे घालून, मनोभावे गुढीची पुजा करतात. गुढीसाठी खास गोडाचा नैवद्य करतात. आजच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी आणि श्रीखंड पुरीचा खास बेत ठरलेला असतो. आज गुढीपाडव्यानिमित्त तुमच्यासाठी आम्ही श्रीखंड पुरीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

श्रीखंड म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ. आता बाजारात यात अनेक फ्लेवर देखील मिळू लागले आहेत, ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स, आम्रखंड असे काही पर्याय आहेत. त्यामुळे त्याच्या किंमतीही जास्त असल्याचं दिसून येतं. पण प्रत्येक वेळी श्रीखंड बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करणे अधिक चांगलं. त्यामुळे श्रीखंडासाठी लागणारा चक्का घरीच कसा तयार करावा हे जाणून घेऊयात.

चक्का कसा करावा?
३०० ग्रॅम चक्कासाठी ५०० ग्रॅम ताजे दही बारीक मलमलच्या कपड्यामध्ये १ दिवस टांगून ठेवावे. नंतर त्यावर वजन ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी ते दाबून ठेवावे. यामुळे जो काही पाण्याचा अंश उरला असेल तर तो बाहेर येईल.


Gudi Padwa 2023 :गुढीपाडव्याचा खास बेत! कटाची आमटी बनवा ‘या’ सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद

श्रीखंड कसं करावं?
चक्का तयार झाल्यानंतर तो एका पातेल्यात घेऊन फेटून घ्यावा. साधारणपणे चक्का पातळ होईल इतपत फेटावा. त्यात कोणतीही गुठळी राहता कामा नये. चक्का फेटून झाल्यावर त्यात तुमच्या चवीनुसार अंदाजे साखर घालावी व तुम्हाला आवड असल्यास त्या सुकामेवा किंवा फळांच्या बारीक फोडी करुन घालाव्यात.

पुरी हा एक भारतीय पदार्थ आहे. पुरी ही गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. पुरी सहसा पनीर मसाला, काजू करी, बटाट्याची पिवळी भाजी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खीर यांसोबत सर्व्ह केली जाते.

पुरी कशी तयार करावी?

पुरी तयार करताना गव्हाच्या पिठामध्ये मीठ, तेल, आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ चांगले मळून घेतल्यानंतर त्याचे लहान गोळे तयार करुन पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यानंतर या पुऱ्या गरम तेलांमध्ये मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्याव्यात.

गरमा गरम पुरीसोबत आंबड गोड श्रीखंडाचा आनंद घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 12:34 IST

संबंधित बातम्या