साऊथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर लगेचच इडली, डोसा, वडा, उत्तपा यांसारखे पदार्थ हजर होतात. परंतु, या सर्व पदार्थांमध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ येत असतो तो म्हणजे मसाल्यांचा ठसका, चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा असणारा रस्सम. रस्सम हा पदार्थ विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ला जातो. त्यामध्ये असणारे घटक आरोग्यासाठी चांगले असून, आपली पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे हिवाळ्यात ऊब आणि आराम देणारा पदार्थ म्हणून रस्समचे हमखास सेवन केले जाते. त्यासोबतच जर तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल, तर त्यावरही घरगुती उपाय म्हणून काही जण रस्सम पितात.
तुम्हाला हवे असेल तर भात, इडली, वडा, डोसा यांसारख्या पदार्थांसोबत रस्सम खाल्ले जाऊ शकते. इतर पदार्थांमध्ये जसे वैविध्य असते, तसेच रस्सममध्येही पारंपरिक ते लिंबू घालून बनवलेले रस्सम आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत पदार्थाची चव तशीच लागते आहे आणि रस्सम फार घट्ट किंवा पातळ नसेल तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये हवे ते बदल करू शकता. घरी, दक्षिणेकडील रस्सम हा पदार्थ अगदी तिथे मिळतो तसा तुम्हाला बनवायचा असेल, तर या पाच टिप्सची तुम्हाला खूप मदत होईल. या पाच टिप्ससोबतच एक बोनस स्वरूपात आणि फार महत्त्वाची टीप सर्वांत शेवटी सांगितली आहे, ती नक्की लक्षात ठेवा.
साऊथ इंडियन रस्सम बनवण्याच्या पाच टिप्स
१. चिंच
रस्सम म्हटले की, त्यामध्ये चिंच किंवा चिंचेचे पाणी हे सर्वांत महत्त्वाचे पदार्थ म्हटले जाऊ शकतात. चिंचेमुळे या पदार्थाला त्याचा आंबटपणा प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे रस्सम बनवण्याआधी किमान अर्धा तास कोमट पाण्यात चिंच भिजवून, मगच त्याचा वापर करावा.
हेही वाचा : हिवाळ्यात सर्दी खोकला दूर ठेवण्यासाठी ‘ही’ गोळी करेल मदत; फक्त ‘या’ दोन गोष्टींचा करा वापर, रेसिपी पाहा
२. तूरडाळ
रस्सममध्ये प्रामुख्याने तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. त्यामुळे रस्समला त्याची अस्सल चव मिळण्यास मदत होते. परंतु, ती उपलब्ध नसल्यास तुम्ही इतर डाळी वापरू शकता.
३. रस्सम पावडर
घरगुती रस्सम पावडर किंवा रस्सम मसाला बनवण्यासाठी लाल मिरची, जिरे, मेथीचे दाणे, मिरे, बेसन / चण्याच्या डाळीचे पीठ व संपूर्ण धणे घेऊन सर्व पदार्थ मध्यम आचेवर तुपावर परतून घ्यावे. आता भाजलेले पदार्थ गार झाल्यानंतर ते मिक्सरला लावून वाटून घ्या आणि रस्सम बनवताना त्यामध्ये या पावडरचा उपयोग करा.
४. कोथिंबिरीचा वापर
जर तुम्ही जास्त प्रमाणात रस्सम बनवणार असाल, तर त्यामध्ये कोथिंबिरीचा वापर करू नका. त्याऐवजी जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम करून खाणार असाल, तेव्हाच कोथिंबीर घालावी.
५. लिंबू
रस्सममध्ये चिंच जरी महत्त्वाची असली तरीही कधी कधी वेगळ्या प्रकारे रस्सम बनवायचे असल्यास किंवा चिंच उपलब्ध नसल्यास, चिंचेऐवजी लिंबाच्या रसाचा वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा : Recipe : अंड्याचा वापर न करता बनवा स्ट्रॉबेरी मफिन्स; काय आहे प्रमाण आणि रेसिपी पाहा
आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाची अशी एक बोनस टीपदेखील लक्षात ठेवा. कधीतरी एखादा पदार्थ बनवताना आपला अंदाज चुकतो किंवा प्रमाणामध्ये गडबड होते आणि पदार्थ फसतो. तसेच रस्सम बनवताना कधी कधी त्याच्यातील आंबटपणा जास्त होऊन, पदार्थ खाल्यानंतर दात आंबतात. अशा वेळेस काय करावे? त्यासाठी ही टीप पाहा.
रस्सममधील अतिरिक्त आंबटपणा कसा घालवावा?
रस्सम बनवताना चिंच आणि टोमॅटो अशा दोन्ही आंबट पदार्थांचा वापर केला जातो. प्रत्येक टोमॅटोची चव वेगळी असल्याने कधीतरी रस्सम अपेक्षेपेक्षा जास्तच आंबट होते. अशा वेळी चण्याची डाळ शिजवून घेऊन, नंतर त्यामध्ये गूळ घाला. दोन्ही पदार्थ व्यवस्थित शिजल्यानंतर ते रस्सममध्ये मिसळून घ्या. त्याने पदार्थाचा आंबटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.