Festive Easy Recipe in Marathi: सणासुदीच्या काळात घरात पाहुणे आले की चहासोबत काय द्यायचं, हा प्रश्न नेहमीच पडतो. चिवडा, शेव, भजी किंवा नेहमीचे पदार्थ करण्यापेक्षा यंदा काहीतरी हटके करून पाहायचं असेल तर मखाना कुरकुरीत बाईट्स नक्की करून पाहा. मखान्यापासून तयार होणारा हा पदार्थ बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मसालेदार लागतो.

विशेष म्हणजे यासाठी फार वेळ किंवा जास्त साहित्य लागत नाही. सणाच्या दिवसांत नाश्ता, संध्याकाळचा चहा किंवा पाहुण्यांसाठी झटपट स्नॅक म्हणून हा पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतो.

साहित्य

  • २ कप मखाने
  • २ मध्यम आकाराचे बटाटे
  • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
  • ½ टीस्पून जिरे
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून आमचूर पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • तेल

कृती

सर्वप्रथम मखाने कढईत घालून मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्या. मखाने कुरकुरीत झाले की गॅस बंद करा. ते थंड झाल्यावर हाताने किंवा मिक्सरमध्ये अगदी हलकेच कुटून घ्या. त्याची बारीक पावडर करू नका; थोडे छोटे तुकडे राहू द्या. यामुळे बाईट्सना छान कुरकुरीत टेक्स्चर मिळते.

आता बटाटे उकडून त्यांची साल काढा आणि एका भांड्यात चांगले कुस्करून घ्या. त्यात कुटलेले मखाने, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घाला. सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा.

या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून त्यांना हलके दाब देत बाईट्सचा आकार द्या. कढईत तेल गरम करून हे बाईट्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तेलात सोडताना कढईत जास्त बाईट्स एकाच वेळी टाकू नका.

तयार झालेले कुरकुरीत मखाना बाईट्स टिश्यू पेपरवर काढा. गरमागरम बाईट्स हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. सणासुदीच्या चहापानासाठी हा झटपट आणि हटके पदार्थ नक्कीच सगळ्यांना आवडेल.